गडचिरोली : देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा कारभार आॅनलाईन करण्यात येत असून काही प्रमाणात ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याअंतर्गत २०१४ या एका वर्षात सुमारे ५६ हजार ४८५ आॅनलाईन दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यानंतर सर्वच दाखले आॅनलाईन मिळणार असून त्याची प्रक्रिया सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उतरंडीतील सर्वात ग्रामपंचायत हा सर्वात शेवटचा घटक असला तरी भारताची अर्थव्यवस्था ग्रामीण भागावर अवलंबून असल्याने ग्रामपंचायतीला विशेष महत्त्व आहे. केंद्र शासनाकडून पाठविण्यात येणारा पैसा राज्य किंवा जिल्हा परिषदेच्यामार्फतीने पाठविण्यात येत होता. मात्र त्याला अनेक पाय फुटत असल्याने ग्रामपंचायतला पैसा पोहोचेपर्यंत त्यातील अर्धा निधी गडप होत होता. या प्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने देशातील सर्वच ग्रामपंचायती आॅनलाईन करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याअंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) केंद्राची निर्मिती करण्यात येत आहे. हे सर्व काम करण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्याबरोबरच शासकीय कामासाठी ग्रामपंचायतीचे दाखले अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. मात्र सरपंच व ग्रामसेवक वेळेवर उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना दाखल्यांसाठी वेळोवेळी ग्रामपंचायतीचे खेटे मारावे लागतात. यातून नागरिकांची सुटका करण्यासाठी २७ प्रकारचे नमूने व १९ प्रकारचे दाखले आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ३२ हजार २८७ दाखले आॅनलाईन बनविण्यात आले आहेत. यामध्ये जन्मनोंदीचे ३ लाख ८५ हजार ९२८, मृत्यू नोंदीचे १ लाख २३ हजार ९९१, नमूना आठ चे २ लाख २२ हजार ३६८ दाखले बनविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नागरिकांचे वेगवेगळ्या प्रकारचे जवळपास २० ते २५ लाख दाखले व नमूने बनवावे लागणार आहेत. या कामासाठी आणखी कालावधी लागणार आहे. त्यामुळे संग्राम केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी जन्म, मृत्यू व नमूना आठ हे नेहमी उपयोगी पडणारे दाखले बनविण्याचे काम प्राध्यान्याने हाती घेण्यात आले आहे. दाखले बनल्यानंतर त्याचा लाभही देण्याचे काम सुरू झाले आहे. २०१४ या वर्षात ५६ हजार ४८५ दाखल्यांचे आॅनलाईन पद्धतीने वाटप झाले आहे. यामध्ये ग्रामसेवा केंद्राच्या मार्फतीने १० हजार ८०१, संग्राम सॉफ्टच्या वतीने ४५ हजार ३६९ व सर्व्हिस प्लसच्या माध्यमातून ३१५ दाखले वाटप झाले आहे. दाखले आॅनलाईन करण्याची प्रक्रिया प्रत्येक संग्राम केंद्रांमधील कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. राज्यभरातील सर्वच नागरिकांचे दाखले तयार झाल्यानंतर हे दाखले इंटरनेटवर आॅनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मात्र यातील काही दाखलेच इंटरनेटवरून परस्पर नागरिकाला काढता येणार आहेत. ज्या दाखल्यांसाठी शुल्क आकारल्या जाते, असे दाखले मात्र ग्रामपंचायतींमध्येच जाऊन घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत जो शुल्क आकारेल तो शुल्क संबंधित व्यक्तीला द्यावा लागणार आहे. (नगर प्रतिनिधी)
५६ हजार आॅनलाईन दाखल्यांचे वाटप
By admin | Updated: February 5, 2015 23:09 IST