लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात पुरेसे पद्व्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी २० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. सिध्दार्थ विनायक काने यांनी घेता आहेत. हा निर्णय शैक्षणिक सत्र २०१९-२० करिता लागू आहेत.गोंडवाना विद्यापीठात अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी नागपूर विद्यापीठात २० टक्के जागा राखीव ठेवाव्या, अशी मागणी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर यांनी कुलपतींकडे केली होती. त्यानुसार जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. गोंडवाना विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ७ ते १२ आॅगस्ट या कालावधीत आॅनलाईन नोंदणी करून प्रवेश निश्चित करावा. अधिक माहितीसाठी गोंडवाना विद्यापीठाने संकेतस्थळावर परिपत्रक निर्गमित केले आहे, ते वाचावे, असे आवाहन प्रभारी कुलसचिव यांनी केले आहे.गोंडवाना विद्यापीठासोबत एकूण २१० महाविद्यालये संलग्नित आहेत. विद्यापीठात सद्य:स्थितीत गणित, इंग्रजी, वाणिज्य, इतिहास, समाजशास्त्र पाच पद्व्युत्तर शैक्षणिक विभाग सुरू केले आहेत. विद्यापीठाने स्वयंअर्थसहाय्यातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र, अप्लाईड अर्थशास्त्र, जनसंवाद व एमबीए आदी अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या व्यतिरिक्त आणखी पद्व्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.नागपूर विद्यापीठात या अभ्यासक्रमांना मिळेल प्रवेशएमएससी रसायनशास्त्र, एमएससी भौतिकशास्त्र, एमएससी भूगर्भशास्त्र, एमएससी बायोकेमिस्ट्री, एमएससी बॉटनी, एमएससी झूलॉजी, एमएससी बायोलॉजी, एमएससी मायक्रोबॉयलोजी, एमएससी स्टॅस्टीक, एमएससी होमसायन्स, एमए हिंदी, एमए संस्कृत, एमए पाली, एमए राज्यशास्त्र, एमए पब्लिक अॅडमिनीस्ट्रेशन, एमए सॉयकालॉजी, एमए फिलासॉपी, एमए आंबेडकर थॉट, मॉस कम्युनिकेशन, एलएलएम, एमलीब, एमएफए आदी अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जाणार आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश मिळविण्याठी विद्यार्थ्यांनी ७ ते १२ आॅगस्ट या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
गोंडवानातील विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठात २० टक्के जागा राखीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:24 IST
गोंडवाना विद्यापीठात पुरेसे पद्व्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी २० टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. सिध्दार्थ विनायक काने यांनी घेता आहेत.
गोंडवानातील विद्यार्थ्यांसाठी नागपूर विद्यापीठात २० टक्के जागा राखीव
ठळक मुद्दे७ ते १२ आॅगस्टपर्यंत मुदत। एमएस्सी, एमए अभ्यासक्रमांचा समावेश