भेंडाळा परिसरात धाड : दोन वाहने घेतली ताब्यात; विशेष दारूबंदी पथकाची कारवाईगडचिरोली : मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विशेष दारूबंदी पथकाच्या पोलिसांनी शुक्रवारी भेंडाळा तालुक्यातील भेंडाळा-सगणापूर मार्गावर भेंडाळापासून एक किमी अंतरावर शेतशिवार परिसरात कारला अडवून कारसहीत एकूण ५ लाख ८२ हजार ४०० रूपयांची अवैध दारू पकडली. या प्रकरणी संजय नवजालीक मेहता (३२) रा. टाकळघाट जि. नागपूर, गोविंदा जानकीराम भोयर (३५) रा. बुट्टीबोरी जि. नागपूर, प्रणीत दत्तू मोहितकर (२०) रा. सातगाव बुट्टीबोरी व सूरज किसन तुमडाम (२४) रा. सातगाव बुट्टीबोरी या चार दारूविक्रेत्या आरोपींना अटक करून त्यांच्यावर मुंबई दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून मूल-भेंडाळा मार्गे चारचाकी वाहनाने दारूची अवैध आयात होत असल्याची गुप्त माहिती विशेष दारूबंदी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांना मिळाली. माहितीच्या आधारे पथकाच्या पोलिसांनी भेंडाळा-सगणापूर मार्गावर गस्त घातली. दरम्यान भेंडाळाकडून दोन चारचाकी वाहने येताना दिसली. सदर वाहने अडवून वाहनाची तपासणी केली असता, एमएच-३३-४३-ए-९६४९ या लाल रंगाच्या कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारू आढळून आली. तसेच एमएच-४०-केआर-८०७६ या महेंद्रा बोलेरो वाहनाची तपासणी केली असता, या वाहनातही मोठा दारूसाठा आढळून आला. वाहनातील सर्व आरोपींना ताब्यात घेऊन पथकाच्या पोलिसांनी त्यांची चौकशी केली. लाल रंगाच्या कारमधून ७२ हजार रूपये किमतीची देशी, विदेशी दारू तसेच दोन लाख रूपये किमतीचे वाहन असा एकूण २ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. बोलेरो वाहनातून १ लाख १० हजार ४०० रूपयांची देशी, विदेशी दारू व दोन लाख रूपयांचे वाहन असा एकूण ३ लाख १० हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. चार आरोपींकडून दोन वाहनांसहीत एकूण ५ लाख ८२ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदर कारवाई दारूबंदी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक कोळी, पोलीस हवालदार कांबळे, उराडे, पोलीस नाईक परिमल बाला, साखरे, दुधलकर, मुंडे, चालक पोलीस शिपाई तावडे आदींनी केली. या कारवाईमुळे भेंडाळा परिसरातील अवैध दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
५ लाख ८२ हजारांची दारू जप्त
By admin | Updated: August 22, 2015 01:56 IST