गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात १० हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चालविले जातात. यामध्ये माध्यमिक शिक्षक व उच्च माध्यमिक शिक्षकांची अनेक पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच या शाळांमध्ये रिक्त असलेल्या जागेवर गतवर्षी कंत्राटी स्वरूपात नऊ शिक्षक घेण्यात आले. या शिक्षकांच्या मानधनापोटी तब्बल ४ लाख ७३ हजार ९०६ रूपये जिल्हा परिषदेकडे प्रलंबित आहेत. परिणामी सदर शिक्षक प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. जिल्हा परिषदेच्या अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये गरज नसतानाही शिक्षकांची अनेक पदे भरण्यात आली आहे. तर काही मोठ्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असून विद्यार्थी व पालकांकडून ओरड होत आहे. मात्र या संदर्भात जि.प.चा शिक्षण विभाग सुस्त आहे. जिल्हा परिषद अंतर्गत गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, घोट, मोहल्ली, बेडगाव, कुरूड, सिरोंचा, कोनसरी व एटापल्ली या १० ठिकाणी हायस्कूल आहेत. यापैकी सहा शाळांमध्ये विज्ञान व कला शाखेचे ११ वी व १२ वीचे वर्ग आहेत. गडचिरोली येथील जि.प. हायस्कूलमध्ये विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक शिक्षकांचे दोन तर घोट येथे एक पद रिक्त आहे. याशिवाय अन्य जि.प. हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटला तरी रिक्त असलेल्या या शाळांमध्ये मानधन तत्वावरील कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी रिक्त असलेल्या जागेवर आपल्या स्तरावर मानधन शिक्षकांची नियुक्ती केली असल्याची माहिती आहे. २७ नोव्हेंबर २००६ च्या शासन निर्णयानुसार जि.प.च्या शिक्षण विभागाने गतवर्षी पाच हायस्कूलमध्ये नऊ शिक्षकांची मानधन तत्वावर नियुक्ती केली. मात्र या शिक्षकांच्या मानधनाचे तब्बल ४ लाख ७३ हजार रूपये जि.प.कडे प्रलंबित आहे. सदर पैसे अदा करण्यासाठी निधी मिळावा यासाठी जि.प.च्या शिक्षण विभागामार्फत शासनाकडे अनेकदा पत्र पाठवून पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र शासनाकडून शिक्षकांचे मानधन देण्यासाठी निधी मिळाला नाही. (स्थानिक प्रतिनिधी) पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष गडचिरोली शहरासह तालुका ठिकाणच्या गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या मोठ्या शाळा आहेत. शिवाय येथे इयत्ता बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे. मात्र या ठिकाणी महत्त्वाच्या विषयांच्या शिक्षकांचे पदे रिक्त असताना सदर पदे भरण्याची कार्यवाही गेल्या वर्षभरापासून थंडबस्त्यात आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या बाबीकडे जिल्हा परिषदेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.
४ लाख ७३ हजार प्रलंबित : मानधन शिक्षक अडचणीत
By admin | Updated: August 7, 2016 01:38 IST