आष्टी पोलिसांची कारवाई : दोन चारचाकी व एक दुचाकी वाहन जप्तआष्टी : मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आष्टी पोलिसांनी आलापल्ली-आष्टी मार्गावर सापळा रचून दोन चारचाकी व एक दुचाकी अशा तीन वाहनासह एकूण ३९ लाख ३१ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल रविवारी दारूविक्रेत्या आरोपींकडून पकडला. याप्रकरणी आरोपी प्रविण देवतळे, खुशाल तेलंग, बंडू वेलादी, राकेश देवतळे, लक्ष्मण गोटपर्तीवार सर्व रा. जयरामपूर व राहूल शिलेवार रा. आष्टी यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आष्टीचे पोलीस निरिक्षक दीपक लुकडे यांना आष्टी-आलापल्ली या मुख्य मार्गावरून दारूची अवैधरित्या वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे आष्टी पोलिसांनी आलापल्ली-आष्टी मार्गावर सापळा रचला. या मार्गावरून टाटा कंपनीचे एमएच ३४ एबी ३२९२ क्रमांकाचे मेटोडोर व एमएच ३३-५७४२ क्रमांकाचे बोलेरो वाहन येताना दिसले. सदर वाहनाला अडवून त्याची तपासणी केली असता, मेटॅडोरमध्ये बॉम्बे स्पेशल विस्की कंपनीच्या विदेशी दारूचे २५४ बॉक्स आढळून आले. तसेच बोलेरो वाहनात बॉम्बे स्पेशल विस्की कंपनीच्या विदेशी दारूचे आठ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी येथून एक दुचाकी, दोन चारचाकी वाहनासह एकूण ३९ लाख २१ हजार ४०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक ए. राजा, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे यांच्या मार्गदर्शनात आष्टीचे पोलीस निरिक्षक दीपक लुकडे, सहायक पोलीस निरिक्षक डी. डब्ल्यू. मंडलवार, पोलीस उपनिरिक्षक नितेश गोहणे, संदीप कापडे, सहायक फौजदार संघरक्षीत फुलझेले, पोलीस हवालदार बाजीराव उसेंडी, नाईक पोलीस शिपाई मिलिंद ऐलावार, प्रमोद उंदीरवाडे, अशोक खेडकर, भुदेव झाडे, विनोद गौरकर आदींनी केली. (वार्ताहर)
३९ लाखांचा मुद्देमाल पकडला
By admin | Updated: April 10, 2017 00:58 IST