गडचिरोली : २००७ पासून सुरू झालेल्या आम आदमी विमा योजनेचा आजपर्यंत ३७९ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला असून या योजनेचे जिल्ह्यात ४७ हजार ७८२ सदस्य आहेत. गरीब व्यक्तीला विमा संरक्षण मिळावे यासाठी शासनाने आम आदमी विमा योजना राज्यात २७ आॅक्टोबर २००७ पासून सुरू केली आहे. या योजनेचा लाभ भूमिहीन शेतमजूर, १ हेक्टर बागायती किंवा २ हेक्टर कोरडवाहू शेती असलेल्या नागरिकाला देण्यात येतो. त्यासाठी लाभार्थ्याचे वय १८ ते ५९ यादरम्यान असणे आवश्यक असून सदर नागरिकाचे नाव बीपीएल यादीमध्ये असणे गरजेचे आहे. नागरिकाने आम आदमी विमा योजनेचा अर्ज तलाठ्याकडे भरून दिल्यानंतर सदर व्यक्तीचा शासनाकडून विमा काढला जातो. या लाभार्थ्याचा विम्याचा वार्षिक हप्ता २०० रूपये राज्य शासनाकडून भरण्यात येते. लाभार्थ्याला स्वत:कडचे पाचही पैसे खर्च करावे लागत नाही. विशेष म्हणजे एकदा तलाठ्याकडे अर्ज केल्यानंतर लाभार्थ्याला काहीच करावे लागत नाही. दरवर्षीचा विमा शासनाकडूनच भरल्या जातो. गडचिरोली जिल्ह्यात भूमिहीन व अल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे या योजनेचे अधिकाधीक सदस्य होतील, याकडे महसूल विभागाने विशेष लक्ष घातले आहे. व्यापक प्रमाणात या योजनेची जनजागृती करण्यात येत आहे. महसूल विभागाचे कर्मचारी प्रत्येक घरी जाऊन या योजनेविषयी जनजागृती करीत आहेत. योजनेच्या सुरूवातीपासून आजपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात या योजनेचे ४७ हजार ७८२ सदस्य झाले आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ६ हजार ४२२, धानोरा ४ हजार ४०५, चामोर्शी ८ हजार ७५७, मुलचेरा ३ हजार ४२८, आरमोरी २ हजार ५८५, देसाईगंज २ हजार २१३, कुरखेडा ५ हजार ८२, कोरची १ हजार ९३०, अहेरी २ हजार ८१५, सिरोंचा ४ हजार ३८६, एटापल्ली ३ हजार ७५३, भामरागड २ हजार १६७ लाभार्थी बनले आहेत. या सर्वांचा विमा काढण्यात आला आहे. योजनेचे सदस्य असलेल्या ३५७ नागरिकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० हजार रूपयांची मदत देण्यात आली आहे. अपघाती मृत्यू झालेल्या २१ लाभार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ७५ हजार रूपये मदत तर एका अपंग लाभार्थ्याला ३७ हजार ५०० रूपयांची मदत देण्यात आली आहे. यामुळे कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)
३८९ लाभार्थ्यांना विमा योजनेचा लाभ
By admin | Updated: December 15, 2014 22:56 IST