तपासणीत अनियमितता : चामोर्शी तालुक्यात भेंडाळा व आष्टी येथे कारवाईगडचिरोली : खरीप हंगामात खत व बियाण्यांचे काळाबाजार तसेच निकृष्ट बियाण्यांची विक्री रोखण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने धडक कृती कार्यक्रम तयार केला असून जिल्ह्यात १२ तालुक्यात १३ पथक तयार करण्यात आले आहे. याअंतर्गत कृषी केंद्रांची तपासणी करून कारवाई केली जात आहे. शुक्रवारी चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा व आष्टी येथील दोन कृषी केंद्रात ३५ लाख ८५ हजार ६७६ रूपयांच्या रासायनिक खताची विक्री थांबविण्याचे आदेश चामोर्शी पं. स. चे कृषी विस्तार अधिकारी तथा गुणनियंत्रण निरीक्षक पी. पी. राऊत यांनी दिले आहे.जि. प. चे कृषी विकास अधिकारी एस. टी. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली चामोर्शी पं. स. चे कृषी विस्तार अधिकारी पी. पी. राऊत यांनी शुक्रवारी भेंडाळा येथील देवीकिशन कृषी केंद्र व आष्टी येथील विनोद कृषी केंद्रात धाड टाकून तपासणी केली. दरम्यान दोन्ही कृषी केंद्रात अनियमितता आढळून आली. त्यामुळे राऊत यांनी रासायनिक खते नियंत्रण आदेश १९८५ चे उल्लंघन झाल्या प्रकरणी सदर दोन्ही कृषी केंद्र परवानाधारकांना ३५ लाख ८५ हजार ६७६ रूपये किंमतीच्या रासायनिक खत विक्रीच्या बंदीचे आदेश दिले आहेत. भेंडाळा येथील देवीकिशन कृषी केंद्रात विहीत नमुन्यातील अभिलेखे न ठेवणे, निरीक्षणाकरिता आलेल्या खत निरीक्षकांना खतांची माहिती व अभिलेखे उपलब्ध करून न देणे, वैध उगम प्रमाणपत्र न जोडता रासायनिक खताची खरेदी व विक्री करणे याबाबी तपासणीदरम्यान आढळून आल्या. रासायनिक खत नियंत्रण आदेशातील तरतुदीचे उल्लंघन झाल्यामुळे संबंधित कृषी केंद्र संचालकाला एकूण ११ लाख ७१ हजार १७४ रूपये किंमतीच्या खतविक्री थांबविली आहे. यामध्ये एसएसपी २६.३५ मेट्रिक टन, कृषी उद्योग ३० मेट्रिक टन, युरिया ३३.४ मेट्रिक टन, १८:१८:१० मनिरत्न ६.७५ मेट्रिक टन, २०:२०:००:१३ नावाचे ४.२ मेट्रिक टन व एमओपी २.४५ मेट्रिक टन खताचा समावेश आहे. आष्टी येथील विनोद कृषी केंद्रात तपासणीदरम्यान वैध उगम प्रमाणपत्र न जोडता रासायनिक खताची खरेदी व विक्री करणे, साठा पुस्तक, पावती पुस्तक याचा ताळमेळ न जुडणे आदी बाबी निदर्शनास आल्या. त्यामुळे या कृषी कें द्रातील एकूण २४ लाख १४ हजार ५०० रूपये किंमतीच्या खताची विक्री थांबविण्याचे आदेश संबंधित कृषी केंद्र संचालकाला देण्यात आले आहे. विक्री थांबविलेल्या खतामध्ये युरिया १८.५ मेट्रिक टन, एसएसपी ५३ मेट्रिक टन, २०:२०:००:१३ नावाचे १३.७५ मेट्रिक टन, कृषी उद्योग १८.५ मेट्रिक टन, १६:१६:१६ आयपीएल ६० मेट्रिक टन आदी खतांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
३५ लाख ८५ हजारांच्या खताची विक्री थांबविली
By admin | Updated: July 26, 2015 02:45 IST