सुनील खोब्रागडे यांचा आरोप : दलित व आदिवासी नक्षल्यांच्या टार्गेटवरगडचिरोली : पोलीस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार १९९० पासून आतापर्यंत १५ वर्षांच्या कालावधीत नक्षल्यांकडून गडचिरोली जिल्ह्यातील ३४१ आदिवासी नागरिकांच्या तर २२ दलित नागरिकांच्या हत्या झाल्या आहेत. जातीद्वेष भावनेतून नक्षल्यांकडून आदिवासी व दलितांच्या मोठ्या हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत, असा आरोप स्वारीप युथ रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष तथा एका वृत्तपत्राचे संपादक सुनील खोब्रागडे यांनी बुधवारी गडचिरोली येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.यावेळी बोलताना सुनील खोब्रागडे म्हणाले, महाराष्ट्र राज्यात दलित, आदिवासी व इतर दुर्बल घटकातील नागरिकांच्या अत्याचाऱ्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर असून अहमदनगर जिल्हा अॅट्रोसिटीच्या गुन्ह्यात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. नक्षल चळवळीतील वरिष्ठ जातीच्या नेत्यांनी जातीय दृष्टिकोनातून गडचिरोली जिल्ह्यात गेल्या १५ वर्षांत दलित व आदिवासी नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात हत्या केल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात १५ वर्षांत ओबीसी प्रवर्गातील नऊ नागरिकांच्या हत्या झाल्याची नोंद पोलीस विभागाकडे आहे, असेही खोब्रागडे म्हणाले. नक्षल्यांकडून दलित व आदिवासी नागरिकांच्या झालेल्या हत्या संदर्भात संबंधित आरोपींवर भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास केला जातो. मात्र जातीय द्वेषभावनेतून आदिवासी व दलितांच्या हत्या झाल्या आहेत. या हत्यांच्या गुन्ह्याचा तपास पोलीस विभागाने जातीयदृष्टिकोनातून करावा, नक्षल्यांकडून आदिवासी व दलितांच्या हत्येप्रकरणात पोलिसांनी भादंविच्या विविध कलमासोबतच अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करावा, तसेच या हत्या जातीय हत्या म्हणून घोषित करण्यात याव्या, अशी मागणी खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना आपण दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील रहिवासी पत्रू दुर्गे याची २०१५ च्या मे महिन्यात नक्षल्यांनी जातीय द्वेषभावनेतून हत्या केली, असा आरोप खोब्रागडे यांनी केला. ग्राम पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर दामरंचाचे सरपंचपद अनुसूचित जातीकरिता राखीव करण्यात आले. त्यानंतर काही दिवसात नक्षल्यांनी पत्रू दुर्गे याची हत्या केली, असे स्वारिप युथ रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष खोब्रागडे यांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
१५ वर्षांत जिल्ह्यात आदिवासींच्या ३४१ तर दलितांच्या २२ हत्या
By admin | Updated: July 11, 2015 02:29 IST