आश्रमशाळांमध्ये तात्पुरते समायोजन : अप्पर आयुक्तांचे आदेश प्रकल्प कार्यालयात धडकलेदिलीप दहेलकर गडचिरोलीआदिवासी विकास विभागाच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत नागपूर, देवरी, भंडारा, चिमूर या चार एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या शासकीय आश्रमशाळांतील पटसंख्या मोठ्या प्रमाणात रोडावल्यामुळे ३३ प्राथमिक शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले आहे. त्यांची सेवा कायम ठेवून गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही प्रकल्पांच्या आश्रमशाळांमध्ये या ३३ प्राथमिक शिक्षकांचे तात्पुरते समायोजन करण्यात आले आहे. यासंदर्भात नागपूर विभागाच्या अप्पर आयुक्तांचे आदेश गडचिरोलीच्या प्रकल्प कार्यालयाला धडकले आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्याबाहेरील ३३ प्राथमिक शिक्षकांची गडचिरोली जिल्ह्यात ‘एन्ट्री’ होणार आहे. आदिवासी विकास विभाग नागपूरच्या अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी काही महिन्यांपूर्वी नागपूर प्रादेशिक विभागातील शासकीय आश्रमशाळांच्या प्राथमिक शिक्षक संवर्गातील कर्मचारी व विद्यार्थ्यांचा आढावा घेतला. यावेळी त्यांना नागपूर विभागाअंतर्गत नागपूर, देवरी, भंडारा व चिमूर या चार प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमधील प्राथमिक वर्गातील पटसंख्या प्रचंड रोडावल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक प्राथमिक शिक्षक अतिरिक्त ठरले. ज्या आश्रमशाळेवर विद्यार्थी संख्येच्या तुलनेत प्राथमिक शिक्षकांची आवश्यकता आहे, अशा शाळेतील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन अतिरिक्त ठरलेल्या ३३ शिक्षकांना तात्पुरत्या स्वरूपात गडचिरोली जिल्ह्याच्या तीन प्रकल्पातील आश्रमशाळांमध्ये समायोजित करण्यात आले आहे. अतिरिक्त ठरलेल्या या शिक्षकांना तिन्ही प्रकल्पातील आश्रमशाळांमध्ये तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय अतिरिक्त ठरलेले ३३ शिक्षक ज्या शाळेच्या मूळ आस्थापनेवर नियुक्त आहेत. त्या आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी तत्काळ संबंधित शिक्षकांना त्या आश्रमशाळेतून कार्यमुक्त करावे, असे सक्त निर्देशही अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी नागपूर, देवरी, भंडारा, चिमूर या चारही प्रकल्पातील संबंधित आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांना दिले आहेत. सध्या आश्रमशाळेला दिवाळी सणाच्या २३ नोव्हेंबरपर्यंत सुट्या आहेत. २४ नोव्हेंबर मंगळवारपासून जिल्ह्यातील सर्व शासकीय आश्रमशाळा पूवर्वत सुरू होत आहे. शाळा सुरू होताच अतिरिक्त ठरलेले ३३ शिक्षक नियुक्ती झालेल्या आश्रमशाळांमध्ये रूजू होणार आहेत. गडचिरोली जिल्ह्याच्या आश्रमशाळेत तात्पुरत्या स्वरूपात समायोजन होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचे वेतन व भत्ते त्यांच्या मूळ आस्थापना असलेल्या आश्रमशाळेवरून उपस्थिती प्रमाणपत्रानुसार अदा करण्यात येईल, असेही अप्पर आयुक्त डॉ. खोडे यांनी आदेशात म्हटले आहे. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये ४० निवासी व १० अनिवासी असे ५० विद्यार्थी पटसंख्या पहिल्या वर्गात आवश्यक आहे. ५० पटसंख्या असलेल्या एका प्राथमिक वर्गासाठी एका शिक्षकाची नियुक्ती केली जाते. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत सात शिक्षक बसतात. इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत या तीन वर्गाला चार शिक्षक व एक मुख्याध्यापक असे पाच शिक्षकांची नियुक्ती केली जाते. नागपूर, चिमूर, भंडारा, देवरी या चार प्रकल्पातील आश्रमशाळांतील प्राथमिक वर्गात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पटसंख्या कमी झाली. त्यामुळे अप्पर आयुक्तांनी सदर तात्पुरत्या समायोजनाचा निर्णय घेतला आहे.अशी झाली शिक्षकांची तात्पुरती नियुक्तीगडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत आश्रमशाळांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या १२ शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुरूमगाव येथील आश्रमशाळेत तीन प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. येरमागड आश्रमशाळेत दोन, पेंढरी एक, रामगड दोन, ग्यॅरापत्ती एक, रेगडी एक, गोडलवाही एक, येंगलखेडा आश्रमशाळेत एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अहेरी प्रकल्पाच्या आश्रमशाळांमध्ये एकूण १४ प्राथमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये पेरमिली दोन, बामणी दोन, जिमलगट्टा एक, झिंगानूर तीन, देचलीपेठा दोन, गुड्डीगुडम एक, मुलचेरा एक, व्यंकटापूर एक, सिरोंचा आश्रमशाळेत एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.भामरागड प्रकल्पाच्या आश्रमशाळांमध्ये सात शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोठी व जांभिया या आश्रमशाळेत प्रत्येकी दोन तर ताडगाव, लाहेरी व कसनसूर या आश्रमशाळांमध्ये प्रत्येकी एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली.
३३ शिक्षकांची जिल्ह्यात होणार ‘एन्ट्री’
By admin | Updated: November 19, 2015 01:50 IST