चामोर्शी बाजार समिती निवडणूक : ६३ उमेदवार मैदानातचामोर्शी : जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या चामोर्शी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी गुरूवारी ३१ उमेदवारांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे तीन उमेदवार अविरोध निवडून आले आहे. १५ जागांसाठी ६३ उमेदवार आता मैदानात राहणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत गुरूवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी सेवा सहकारी संस्थेच्या ७ सर्वसाधारण जागेसाठी १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता ३३ उमेदवार उरले आहेत. महिला गटातून दोन जागांसाठी चार उमेदवार, इतर मागासवर्ग गटातून सात उमेदवारांनी माघार घेतल्याने नऊ उमेदवार कायम आहे. ग्राम पंचायत मतदार गटातून सर्वसाधारण दोन जागेसाठी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने सात उमेदवार रिंगणात आहे. अनुसूचित जाती, जमाती मतदार संघात एका जागेसाठी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला. तीन उमेदवार मैदानात उरले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक गटातून एका उमेदवाराची माघार झाल्यानंतर चार उमेदवार मैदानात आहे. हमाल मतदार संघातून एका जागेसाठी तीन उमेदवार भाग्य आजमावत आहे. व्यापारी व अडते मतदार संघात दोन जागांसाठी चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने या मतदार संघातून श्यामराव लटारे व चंद्रकांत दोशी हे अविरोध निवडून आले आहेत. पणन प्रक्रिया मतदार संघातून एकच उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे येथून अमोल गंगाधरराव गण्यारपवार अविरोध निवडून आले आहे. या निवडणुकीत बाजार समितीचे विद्यमान सभापती अतुल गण्यारपवार पॅनल व भाजपने मैदानात उतरविलेल्या उमेदवारांची टक्कर होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
३१ उमेदवारांची माघार; तीन अविरोध
By admin | Updated: August 28, 2015 00:11 IST