गडचिरोली : मानव विकास मिशन अंतर्गत यंदा २०१५-१६ वर्षात बाहेरगाववरून शाळांमध्ये ये-जा करणाऱ्या एकूण ९६ शाळांमधील ३ हजार २०० विद्यार्थिनींना सायकल मंजूर करण्यात आल्या. यापैकी आतापर्यंत २ हजार ८९२ विद्यार्थिनींना सायकल वितरित करण्यात आल्या. शालेय प्रशासनाच्या दिरंगाईमुळे दुसरे सत्र सुरू होऊनही तब्बल ३०८ विद्यार्थिनी सायकल मिळण्याच्या लाभापासून वंचित आहेत. मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता आठवीचे १२ वीपर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून ५ किमी अंतरावर राहणाऱ्या गरजू मुलींना सायकल वाटप करण्याची योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाद्वारे राबविली जाते. २०१५ च्या एप्रिल महिन्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा मानव विकास समितीचे अध्यक्ष रणजितकुमार यांनी ९६ शाळांमधील ३ हजार २०० विद्यार्थिनींना सायकल मंजूर केल्या. या योजनेसाठी जिल्हा परिषदेला ९६ लाख रूपयांचे अनुदान मंजूर करून ते जि.प. कडे वर्ग करण्यात आले. विद्यार्थिनी निवड प्रक्रिया आटोपल्यानंतर जि.प.च्या माध्यमिक शिक्षण विभागाने प्रती लाभार्थी तीन हजार रूपयांप्रमाणे ९६ लक्ष रूपये संबंधित शाळांच्या बँक खात्यात वळते केले. या निधीतून महिनाभरात सायकल खरेदी करून त्या वितरित करण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांवर होती. मात्र अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी सायकल वितरणाकडे दुर्लक्ष केल्याने ३०८ विद्यार्थिनी सायकलपासून वंचित आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)भामरागडात प्रस्ताव नाही, कोरची तालुका आघाडीवरगतवर्षी २०१४-१५ च्या सत्रात भामरागड तालुक्यातील एकाही माध्यमिक शाळांनी विद्यार्थिनींना सायकल मिळण्याबाबतचा प्रस्ताव जि.प.च्या शिक्षण विभागाला सादर केला नाही. त्यामुळे या तालुक्यातील शाळांसाठी सायकली मंजूर करण्यात आल्या नाही. कोरची तालुक्यात चार शाळांनी ७७ पैकी सर्वच लाभार्थी विद्यार्थिनींना सायकलचे वितरण करून मानव विकास मिशनच्या या योजनेत आघाडी घेतली आहे.
३०८ विद्यार्थिनी सायकलपासून वंचित
By admin | Updated: December 2, 2015 01:05 IST