मुख्यमंत्री ग्राम सडक योजना : तालुकानिहाय दोन वर्षांच्या नियोजन आराखड्यास शासनाची मंजुरीगडचिरोली : राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत २०१५-१६ मध्ये ७९.९० व २०१६-१७ मध्ये २१३.८६ किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत. प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना कार्यालयाने याचे नियोजन केले आहे. या नियोजनात दुर्गम भागातील रस्त्यांना प्राधान्य देण्यात आले आहे. या नियोजनाला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्याचबरोबर निधीही उपलब्ध करून दिला जाणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून दुर्गम भागात रस्त्यांचे जाळे निर्माण होण्यास मदत होणार आहे. रस्त्यांचे महत्त्व ओळखून तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान ग्रामीण सडक योजना सुरू केली. या योजनेंतर्गत देशभरात लाखो किमीचे रस्ते बांधण्यात आले. मात्र या योजनेसाठी केंद्र शासनाने आता निधी देणे बंद केले आहे. त्यामुळे राज्य शासनाने याच योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली आहे. जो भाग रस्त्यांनी जोडला गेला नाही, अशा भागात रस्ते तयार करण्यावर विशेष प्राधान्य दिले जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावे अजूनपर्यंत बारमाही रस्त्यांनी जोडण्यात आली नाही. त्यामुळे या योजनेत गडचिरोली जिल्ह्यासाठी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त किमीचे रस्ते मंजूर केले आहेत. २०१५-१६ मध्ये ७८ व २०१६-१७ मध्ये २०३ किमीचे रस्ते बांधण्याचे उद्दिष्ट दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री सडक योजना कार्यालयाने २०१५-१६ मध्ये ७९.९० व २०१६-१७ मध्ये २१३.८६ किमीचे रस्ते तयार करण्याबाबत तालुकानिहाय नियोजन केले आहे. या नियोजनाला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री सडक योजना पाच वर्ष राबविली जाणार असून त्याचे उद्दिष्टही आताच निश्चित केले आहे. (नगर प्रतिनिधी)लवकरच कामाला सुरुवातमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. आजपर्यंत निधी नसल्याने नियोजन पूर्ण होऊनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. मात्र निधीची तरतूद झाल्याने दोन्ही वर्षांच्या कामाचे एकत्रित टेंडर काढले जाणार आहे. त्यामुळे सदर रस्त्यांची कामे एक महिन्यात सुरु होणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या रस्त्यांना जोडणारप्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्ते तयार करताना जास्तीत जास्त गावे जोडण्यासाठी कोअर नेटवर्क तयार करण्यात आले होते. मात्र प्रधानमंत्री ग्राम सडक योजना बंद पडल्याने हे नेटवर्क अपुरे राहिले होते. त्यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेवर झालेला खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आता हे कोअर नेटवर्क पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे संबंधित गावे एकमेकांशी जोडण्यास फार मोठी मदत झाली आहे.
२८४ किमीचे रस्ते होणार तयार
By admin | Updated: April 8, 2016 01:07 IST