दीड वर्ष उलटले : जि. प. शाळेतील कामांना लागला ब्रेकदिलीप दहेलकर गडचिरोलीसर्व शिक्षा अभियानांतर्गत मंजूर करण्यात आलेले जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील तब्बल २०५ स्वच्छतागृहांचे काम निधीअभावी गेल्या दीड वर्षापासून रखडले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. परिणामी यापूर्वी शाळास्तरावरून स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून स्वच्छतागृहाचे काम पूर्ण करणाऱ्या तब्बल ८५ मुख्याध्यापकांची रक्कम शासन व प्रशासनाकडे प्रलंबित आहे. सदर मुख्याध्यापक खर्च केलेली रक्कम परत मिळविण्यासाठी जि. प. कडे चकरा मारत आहेत.सर्व शिक्षा अभियानांतर्गत गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वतीने सन २०१४-१५ या वर्षात आॅक्टोबर अखेर जिल्ह्यातील २९० जि. प. शाळांमध्ये स्वच्छतागृहाचे काम मंजूर करण्यात आले. या कामाला महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबईच्या कार्यालयाची मान्यतासुद्धा मिळाली होती. प्रती स्वच्छतागृहाची अंदाजपत्रकीय किंमत १ लाख २० हजार रूपये आहे. एवढ्या रकमेत जि. प. शाळांमध्ये शौचालय व दोेन मूत्रिघराची व्यवस्था करण्याचे नियोजन होते. सदर स्वच्छतागृहाचे काम शाळा व्यवस्थापन समितीच्या नियंत्रणाखाली मुख्याध्यापकांना करावयाचे होते. राज्य शासनाकडून २९० स्वच्छतागृहाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात २ कोटी १० लाख ९ हजार ९२० रूपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. स्वच्छतागृहाचे काम सुरू करण्यासाठी जि. प. प्रशासनाने संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना अग्रीम म्हणून पहिल्या हप्त्याचे प्रती स्वच्छतागृह ७२ हजार ४४८ रूपये प्रमाणे एकूण २ कोटी १० लाख ९ हजार ९२० रूपये २०१५ च्या आॅक्टोबर महिन्यात अदा केले. पहिल्या टप्प्याची सदर रक्कम मिळताच २९० जि. प. शाळांच्या मुख्याध्यापकांनी स्वच्छतागृहाचे काम हाती घेतले. मात्र त्यानंतर राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला नाही. काम पूर्ण झाल्यावर आज ना उद्या स्वच्छतागृहाच्या खर्चाची रक्कम मिळेल, या आशेने तब्बल ८५ मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील स्वच्छतागृहाचे काम स्वत:च्या खिशातून खर्च करून पूर्ण केले. आता सदर मुख्याध्यापक शासनाकडून निधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य शासनाकडून जि. प. ला निधी न मिळाल्यामुळे तब्बल २०५ शाळांमधील स्वच्छतागृहाच्या कामाला पूर्णत: ब्रेक लागला आहे. त्यानंतर नोव्हेंबरअखेर महाराष्ट्र राज्याचे सर्व शिक्षा अभियानाच्या कामाचे व निधीचे सुधारित अंदाजपत्रक नोव्हेंबर २०१५ मध्ये सादर करण्यात आले. त्यानंतर डिसेंबरमध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेने गडचिरोली जि. प. ला पत्र पाठवून जिल्ह्यासाठी पूर्वी मंजूर झालेल्या ४१३ स्वच्छतागृहाऐवजी १९१ स्वच्छतागृहाला मान्यता प्रदान केली जात असल्याचे कळविले. मात्र यापूर्वीच आॅक्टोबर महिन्यात २९० स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी संबंधित शाळांना अग्रीम स्वरूपात पहिल्या हप्त्याची रक्कम अदा करण्यात आली होती. त्यानंतर जि. प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शिक्षण परिषद व राज्य शासनाकडे पत्र व्यवहार करून मंजूर २९० स्वच्छतागृहाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा मागणीचे पत्र सादर केले. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही या कामासाठी शासनाकडून निधी मिळाला नाही.१ कोटी ३७ लाख हवेतअर्धवट स्थितीत असलेल्या २०५ व काम पूर्ण झालेल्या ८५ अशा एकूण २९० स्वच्छतागृहांच्या कामाची रक्कम देण्यासाठी राज्य शासनाकडून प्रती स्वच्छतागृह ४७ हजार ५५२ रूपये प्रमाणे एकूण १ कोटी ३७ लाख ९० हजार रूपयांचा निधी जिल्हा परिषद प्रशासनाला मिळणे आवश्यक आहे. सदर निधी मिळाल्यानंतरच उर्वरित २०५ स्वच्छतागृहाचे काम पूर्ण होणार आहे.
निधीअभावी २०५ स्वच्छतागृह रखडले
By admin | Updated: May 5, 2016 00:04 IST