मुरूमगाव : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील २०० रोहयो मजुरांची मजुरी गेल्या दोन वर्षांपासून थकली असल्याने मजुरांवर उपासमारीची पाळी आली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने १४ जून रोजी रविवारला प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत धानोराचे संवर्ग विकास अधिकारी कोल्हे यांनी याबाबत बैठक घेऊन वस्तूस्थिती जाणून घेतली. ग्राम पंचायतीच्या रोहयो कामाच्या हजेरीपत्रकावर नोंद असलेल्या १७६ मजुरांना लवकरच थकीत मजुरी देणार असल्याची माहिती संवर्ग विकास अधिकारी कोल्हे यांनी दिली.बीडीओ कोल्हे यांनी रोजगार हमी योजनेचे अधिकारी राऊत यांच्या समक्ष मुरूमगावात ग्रा. पं. चे ग्रामसेवक पी. एस. बुरांडे यांच्याशी चर्चा केली. रोजगार हमी योजनेच्या सात कामांपैकी पाच कामांचे हजेरीपत्रक मजुरांच्या नवीन यादीनुसार उपलब्ध असल्याचे बुरांडे यांनी सांगितले. दोन रोहयो कामाचे हजेरीपत्रक रोजगार सेवक युधिष्टीर धारणे यांनी गहाळ केले व तो सध्या फारार अल्याची माहिती त्यांनी बीडीओ कोल्हे यांना दिली. हजेरी पत्रकात नोंद असलेल्या १७६ मजुरांच्या बँक खात्यात थकीत मजुरीची रक्कम लवकरच जमा करण्यात येणार आहे. (वार्ताहर)
१७६ रोहयो मजुरांना थकीत मजुरी मिळणार
By admin | Updated: June 21, 2015 02:10 IST