तारांना दिला ताण : वीज महावितरणाची पावसाळ्याची तयारी; मुख्य लाईनकडे विशेष लक्षदिगांबर जवादे गडचिरोलीवीज तारा जमिनीकडे लोंबकळण्यामुळे त्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन स्पार्किंग होण्याची भीती राहते. त्याचबरोबर प्राणी किंवा मानवाचा स्पर्श होऊन अनुचित घटना घडण्याचीही शक्यता राहते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी गडचिरोली व आलापल्ली विभागातील सुमारे १७१ किलोमीटरच्या वीज वाहिन्यांना ताण देऊन त्या दुरूस्त करण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा ८० टक्के भूभाग घनदाट जंगलाने व्यापला आहे. या जंगलातूनच वीज वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात तारांवर झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना सर्वाधिक घडतात. परिणामी वीज कंपनीचा दुरूस्तीचा खर्च इतर जिल्ह्याच्या तुलनेत अधिक आहे. झाडांवर फांदी पडल्याने खांब वाकतात. त्याचबरोबर काही कालावधीनंतर तार आपोआप सैल होतो. तार खाली लोंबकळत राहते. दोन तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने स्पार्कींग होण्याची भीती राहते. स्पार्कींगमुळे आग लागते व विद्युत पुरवठाही खंडीत होतो. त्याचबरोबर विद्युततारा जमिनीकडे अधिकच लोंबकळल्यास प्राणी किंवा मानव यांचा स्पर्श होऊन जीव जाण्याचा धोकाही निर्माण होतो. हे सर्व धोके लक्षात घेऊन वीज वितरण कंपनीच्या मार्फतीने पावसाळ्यापूर्वी वीज तारांना तान देणे सुरू केले आहे. मान्सूनपूर्वपर्यंत गडचिरोली विभागातील ११२ किमी व आलापल्ली विभागातील ५९ किमी असे एकूण १७१ किमीच्या ११ केव्ही वीज वाहिन्यांना तान देऊन त्या दुरूस्त करण्यात आल्या आहेत.विद्युत विभागाच्या मार्फतीने गडचिरोली जिल्ह्यात हजारो किमीचे विद्युत जाळे निर्माण करण्यात आले आहेत. वीज विभागाच्या मार्फतीने १७१ किमी वीज वाहिन्यांना तान देण्यात आले असले तरी शेकडो गावांमधील अजुनही अनेक खांबांवरील तार लोंबकळत असल्याचे दिसून येते. वीज विभागाचे कर्मचारी मुख्य लाईनकडे विशेष लक्ष देतात. मात्र दुर्गम भागातील वीज दुरूस्तीकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. महावितरणाने हे काम मार्गी लावणे गरजेचे आहे.ग्रामीण भागातील इन्सुलेटर व जंपर बदललेवीज खांबात विजेचा प्रवाह सुरू होऊ नये यासाठी इन्सुलेटर हे उपकरण अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविते. इन्सुलेटर फुटल्यास वीज प्रवाह खंडीत होतो. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. जंगलात असलेल्या खांबावरील इन्सुलेटर फुटल्यास वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे इन्सुलेटरची दुरूस्ती करण्यास विशेष प्राधान्य दिल्या जाते. जूनअखेरपर्यंत गडचिरोली विभागातील ११९ तर आलापल्ली विभागातील १५६ इन्सुलेटर बदलवून ते नीट बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर १२९ ठिकाणचे जंपर बदलविण्यात आले आहेत. १० रोहित्रांमध्ये टाकले नवीन आॅईलगावाला वीज पुरवठा करण्यात रोहित्र अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविते. त्यामुळे रोहित्रामधील बिघाड गाववासीयांसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. ही बाब लक्षात घेऊन वीज विभागाने जिल्ह्यातील १० रोहित्रांची दुरूस्ती केली आहे. त्यामधील जुने आईल काढून त्या ठिकाणी नवीन आॅईल टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या रोहित्रामध्ये कमी आॅईल आहे, त्याही रोहित्रांमध्ये आॅईल टाकण्यात आले. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडीत होण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे.११८ खाबांना ताणगडचिरोली विभागातील १४ व आलापल्ली विभागातील १०४ अशा एकूण ११८ खांबांना ताण देऊन ते सरळ करण्यात आले. वादळ वारा व तारांवर झाड कोसळण्यामुळे खांब वाकण्याच्या घटना घडतात. वाकलेल्या खांबांना तान देऊन दुरूस्त केले जाते.
१७१ किमींच्या वीज वाहिन्यांची दुरूस्ती
By admin | Updated: July 17, 2015 01:41 IST