आरमोरी/जोगीसाखरा : तालुक्यातील चामोर्शी माल व सालमारा येथील ६ शेतकऱ्यांचे एकूण १४ एकरातील धानाचे पुंजणे जळाल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी शनिवारला रात्रीच्या सुमारास घडली. यात ६ शेतकऱ्यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व गावातील नागरिकांनी केली आहे.आरमोरी तालुक्यातील चामोर्शी माल येथील शेतकरी मंसाराम रघुजी हनवते व सुदाम रघुजी हनवते या दोन शेतकऱ्यांनी आपल्या ४ एकर शेतामध्ये यंदा श्रीराम धानाची लागवड केली होती. या दोन्ही शेतकऱ्यांनी श्रीराम धानाची कापणी करून आपल्या शेतात मळणीकरीता दोन ठिकाणी पुंजणे टाकले होते. दरम्यान शनिवारच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास शेतामध्ये पेट घेत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. गावातील नागरिकांनी शेताकडे धाव घेतली. मात्र नागरिक पोहोचेपर्यंत ४ एकरातील धानाचे पुंजणे पूर्णत: जळून खाक झाले होते. पुंजणे जळाल्याने या दोन्ही शेतकऱ्यांचे अंदाजे एकूण ३ लाख रूपयाचे नुकसान झाले आहे. पुंजणे जळाल्यामुळे हनवते कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे. कोणीतरी अज्ञात इसमांनी ४ एकरातील श्रीराम धानाचे पुंजणे जाळल्याचा संशय या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेसंदर्भात पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे. पुंजणे जाळणाऱ्या अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी हनवते यांनी केली आहे. सालेमारा येथील योगाजी मानकर यांनी यंदा ४ एकर शेतामध्ये श्रीराम धानाची लागवड केली होती. केशव मानकर यांनी २ एकर, ढेकलुजी इष्टाम यांनी २ एकर शेतात तसेच इंदूबाई मेश्राम यांनी आपल्या २ एकर शेतामध्ये यंदा श्रीराम धानाची लागवड केली होती. शनिवारच्या रात्री या चारही शेतकऱ्यांच्या १० एकर शेतातील धानाचे पुंजणे जळाले. यात या शेतकऱ्यांची एकूण अंदाजे पावणेतीन लाखाचे नुकसान झाले आहे. (प्रतिनिधी)
१४ एकरातील धानाचे पुंजणे जळाले
By admin | Updated: November 30, 2014 23:04 IST