गोविंदपुरात जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी : पोकलँड मशीनसह सहा ट्रॅक्टर, दोन टिप्पर कामावरगडचिरोली : ग्रामस्थांच्या पुढाकारातून गेल्या चार दिवसापासून गोविंदपूर येथील गावतलावात पोकलँड मशीन, सहा ट्रॅक्टर व दोन टिप्परच्या सहायाने गाळ उपसण्याचे काम सुरू झाले आहे. अवघ्या तीन दिवसात या तलावातील १२ हजार ६०० घन मीटर गाळ उपसण्यात आला असून यातून १२.६० टीसीएम म्हणजे १ कोटी २६ लाख लिटर पाणी साठविण्याची क्षमता वाढली आहे. जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी शुक्रवारी गोविंदपूर येथे जाऊन या तलाव खोलीकरणाच्या कामाची पाहणी केली. या तलावात पोकलँडच्या सहाय्याने गाळ काढून ट्रॅक्टरद्वारे आजुबाजुच्या शेतात टाकण्यास शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. दर तासाला १५ ब्रॉस गाळ उपसून काढला जात आहे. गावातील यादव भांडेकर, मोरेश्वर भांडेकर, पुनाजी पिपरे यांच्या शेतात तलावातील गाळ टाकण्याचे काम सुरू आहे. या कामावर सुरूवातीला तीन ट्रॅक्टर होत्या. मात्र आता पोकलँड मशीनसह सहा ट्रॅक्टर व दोन टिप्पर आहे. पाणीसाठ्यात होणारी वाढ आणि त्यासोबत शेतीला होणारा फायदा यातून गोविंदपूरवासीयांनी तलाव खोलीकरणासाठी घेतलेला पुढाकार अतिशय महत्त्वाचा आहे. तलाव खोलीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, असे जिल्हाधिकारी महेश आव्हाड यावेळी म्हणाले. दरम्यान जिल्हाधिकारी आव्हाड यांना उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. ग्रामस्थांच्या पुढाकाराने कठीण कामही सहज शक्य होते, याची प्रचिती गोविंदपुरात आली, असे ते म्हणाले. (स्थानिक प्रतिनिधी)
तलावातून काढला १२ हजार ६०० घनमीटर गाळ
By admin | Updated: May 7, 2016 00:14 IST