जिल्ह्यात : शिक्षकांच्या वेतनावर वार्षिक १० कोटींचा खर्च दिलीप दहेलकर गडचिरोली जिल्ह्याच्या गल्लीबोळात सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा व कान्व्हेंट तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना शासनाने मोठ्या प्रमाणात दिलेल्या परवानगीमुळे जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. परिणामी गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या प्रचंड कमी होत आहे. जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेल्या ११२ शाळांमध्ये एक ते पाच विद्यार्थी संख्या असल्याने या शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहे. सन २०१५-१६ च्या संचमान्यतेनुसार पाचपर्यंत विद्यार्थी पटसंख्या असलेल्या ११२ शाळांमध्ये एकूण २२१ शिक्षक कार्यरत आहेत. या शिक्षकांना महिन्याला ४० हजार रूपये वेतन दिले जाते. २२१ शिक्षकांच्या वेतनावर शासनाला वार्षिक १० कोटींचा खर्च येत आहे. याशिवाय शाळा अनुदान, देखभाल दुरूस्ती, शाळा विद्युतीकरण, शालेय पोषण आहार, स्टेशनरी व इतर बाबींवर ११२ शाळांसाठी पाच कोटींचा खर्च वर्षाला शासनाकडून होत आहे. मात्र विद्यार्थी पटसंख्या कमी झाल्याने सदर शाळा चालविणे शासनाला परवडेनासे झाले आहे. पाचपर्यंत पटसंख्या असलेल्या ११२ जि.प. शाळांचा समावेश असलेल्या शाळांमध्ये दोन शिक्षक असलेल्या १०६ शाळा, एक शिक्षक कार्यरत असलेल्या सहा व एका शाळेमध्ये तीन शिक्षक कार्यरत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक अशा मिळून एकूण १ हजार ५५३ शाळा आहेत. जिल्हा परिषद शाळांची विद्यार्थी पटसंख्या झपाट्याने कमी होत असल्याने सन २०१५-१६ च्या संचमान्यतेनुसार जिल्ह्यातील शेकडो शिक्षक अतिरिक्त ठरले. या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न कायम असून निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. आश्रमशाळांचीही विद्यार्थी पटसंख्या वेगाने कमी होत असल्याने भविष्यात या शिक्षकांवरही संकट ओढावणार आहे. सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्याची गरज जि.प. च्या बहुतांश शाळांमध्ये सेमी इंग्रजी माध्यमाच्या वर्गाची सुविधा नाही. विद्यार्थ्यांसह पालकांकडून सातत्याने सेमी इंग्रजी वर्गाची मागणी होत आहे. जि.प. शाळांची पटसंख्या कायम ठेवण्यासाठी सेमी इंग्रजी माध्यमाचे वर्ग प्रत्येक शाळेमध्ये सुरू करण्याची गरज आहे. उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता एक ते चार वर्ग असलेल्या व एक ते पाच विद्यार्थी पटसंख्या असलेल्या १०६ शाळांमध्ये दोन शिक्षक नियुक्त करण्यात आले आहे. तर एका शाळेत तीन शिक्षक नियुक्त केले आहेत. पाच विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दोन शिक्षक नियुक्त करणे परवडत नाही. मात्र दुसरीकडे एक ते सातचे वर्ग असलेल्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. अनेक जि.प. शाळांमध्ये शिक्षक नाहीत, अशी ओरड शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व पालकांकडून सातत्याने होत आहे. मात्र या प्रश्नाकडे जि.प. शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
११२ जि.प. शाळेत पाचच्या आत विद्यार्थी
By admin | Updated: July 27, 2016 01:31 IST