चामाेर्शी : चामाेर्शी तालुक्यातील ६५ ग्राम पंचायतींमध्ये ४६२ जागांसाठी निवडणूक हाेणार आहे. यासाठी तालुक्यात एकूण १ हजार ५१ उमेदवार रिंगणात आहेत. चामाेर्शी हा जिल्ह्यातील सर्वात माेठा तालुका आहे. या तालुक्यातील ६९ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यापैकी २ ग्राम पंचायतींमध्ये सदस्यांची निवड बिनविराेध झाली. तर २ ग्रामपंचायतींमध्ये नामनिर्देशनपत्र प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे ६५ ग्राम पंचायतींमध्ये प्रत्यक्षात निवडणूक हाेणार आहे. एकूण ६०३ जागांपैकी २७ जागांसाठी नामनिर्देशन पत्रच दाखल झाले नाही. त्यामुळे प्रत्यक्षात ४६२ जागांसाठी मतदान हाेणार आहे. ४६२ जागांसाठी एकूण१२७० उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र सादर केले हाेते. त्यापैकी ६ नामनिर्देशन अवैध ठरले. तर ६ जानेवारी राेजी ९९ उमेदवारांनी नामनिर्देशन मागे घेतले. त्यामुळे प्रत्यक्षात आता १ हजार ५१ उमेदवार रिंगणात आहेत.
गावाच्या विकासाच्या दृष्टीने ग्राम पंचायतीला विशेष महत्त्व आहे. मतदार व उमेदवार गावातीलच राहत असल्याने निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येत आहे. उच्च शिक्षित उमेदवारसुद्धा ग्राम पंचायतींच्या राजकारणात लक्ष घालत आहेत.त्यामुळे निवडणुकीची रंगत आणखी वाढत आहे.