५०० रूपये दंड : जिल्हा न्यायालयाचा निकालगडचिरोली : एका चार वर्षीय बालिकेला खाऊ देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीस येथील विशेष सत्र न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. वामन भगवान पगाडे (३४) रा. भगतसिंह वॉर्ड देसाईगंज असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.पीडित चार वर्षीय बालिका देसाईगंज येथे आपल्या मावशीकडे वास्तव्य करीत होती. ४ सप्टेंबर २०१४ रोजी ती रस्त्याने जात असताना वामन पगाडे याने तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर पीडित बालिकेच्या मावशीने देसाईगंज पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी वामन पगाडे याच्याविरुद्ध अपराध क्रमांक ५६/२०१४, भादंवि कलम ३७६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढे दोनच दिवसांनी ६ सप्टेंबर २०१४ रोजी पोलिसांनी आरोपी वामन पगाडे यास अटक केली. तत्कालिन उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन पांडकर यांनी प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी या प्रकरणाचा निकाल लागला. गडचिरोली न्यायालयाचे विशेष सत्र न्यायाधीश वर्ग-१ यू. एम. पदवाड यांनी सरकारी पक्षातर्फे सर्व साक्षीदारांचे बयाण नोंदवून, तसेच बचाव पक्ष व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ऐकून आरोपी वामन पगाडे यास भादंवि कलम ३७६(२) (आय) व बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दोषी ठरवून १० वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अनिल प्रधान यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक जयेश खंदरकर व पोलिस नाईक जीजा कुसनाके यांनी जबाबदारी सांभाळली. (नगर प्रतिनिधी)
बलात्कार करणाऱ्यास १० वर्षांचा सश्रम कारावास
By admin | Updated: November 16, 2016 01:57 IST