आसरअल्ली पोलीस स्टेशनपासून १० किमी अंतरावर असलेल्या चिंतरेवला गावात गाव संघटनेच्या अथक परिश्रमाने अवैध दारूविक्री बंद होती. मात्र, मागील काही दिवसांपासून पुन्हा नव्याने दारूविक्रीचा अवैध व्यवसाय सुरू झाला. सध्या गावात आठ ते दहा दारूविक्रेते सक्रिय असल्याचे बोलले जात आहे. परिसरातील पोचमपल्ली, जोडेपल्ली, रंगधामपेठा चक, रंगधामपेठा माल, गंजीरामपेठा येथील मद्यपी चिंतरेवला येथे दारू पिण्यासाठी येतात. त्यामुळे परिसरातील नागरिक पूर्णतः त्रस्त आहेत. गाव संघटनेने दिलेल्या माहितीनुसार मुक्तिपथ तालुका चमूने अहिंसक कृतीचे नियोजन केले. त्यानुसार गाव संघटनेच्या महिला व तालुका चमूने गावातील अवैध दारूविक्रेत्याच्या घराची तपासणी केली. दरम्यान दारू काढण्यासाठी टाकलेला १ लाख १२ हजार रुपये किमतीचा १६ ड्रम गुळाचा सडवा आढळून आला. संपूर्ण माल घटनास्थळावरच नष्ट करीत गावात अवैध दारूविक्री न करण्याचे ठणकावून सांगण्यात आले.
१ लाख १२ हजारांचा गुळाचा सडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST