जगभरातील खवय्यांचे लक्ष लागून असलेल्या 'आशियातील ५० सर्वोत्तम रेस्टॉरंट्स २०२६' ची घोषणा झाली असून, भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट ठरली आहे. या प्रतिष्ठित यादीत भारतातील दोन रेस्टॉरंट्सनी मानाचे स्थान मिळवले आहे. मुंबईतील 'मस्क' हे रेस्टॉरंट १५ व्या क्रमांकावर झळकले आहे, तर हिमाचल प्रदेशमधील 'नार' या रेस्टॉरंटने ३० व्या क्रमांकावर झेप घेत यादीत दिमाखात पदार्पण केले आहे.
मुंबईचे 'मस्क': सलग पाचव्या वर्षी अव्वल
मुंबईतील एका जुन्या कापड गिरणीच्या परिसरात वसलेले 'मस्क' हे रेस्टॉरंट गेल्या पाच वर्षांपासून भारतातील सर्वोत्तम रेस्टॉरंट ठरले आहे. २०१६ मध्ये आदिती दुगर यांनी याची स्थापना केली. सध्या शेफ वरुण तोतलानी हे या स्वयंपाकघराचे नेतृत्व करत आहेत. विशेष म्हणजे, येथे कोणतेही पारंपरिक मेनू कार्ड नसते. ऋतूंनुसार बदलणारा १० पदार्थांचा टेस्टिंग मेनू हे येथील वैशिष्ट्य आहे. या खास मेजवानीसाठी एका व्यक्तीला अंदाजे ८,०८५ रुपये (कर वगळून) मोजावे लागतात.
हिमाचलच्या 'नार'चे धमाकेदार पदार्पण
हिमाचल प्रदेशातील कसौली जवळ असलेल्या 'नार' या रेस्टॉरंटने यंदा यादीत ३० वे स्थान पटकावले आहे. प्रसिद्ध शेफ प्रतीक साधू यांनी 'मस्क' सोडल्यानंतर हिमालयातील खाद्यसंस्कृती जगासमोर आणण्यासाठी हे रेस्टॉरंट सुरू केले. केवळ २० आसनक्षमता असलेल्या या रेस्टॉरंटमध्ये हिमालयातील स्थानिक शेतातून आणि जंगलातून आणलेल्या ताज्या साहित्यापासून पदार्थ बनवले जातात. निसर्गातील सहा ऋतूंनुसार येथील मेनू बदलतो, जो पर्यटकांना एक वेगळा अनुभव देतो.
हाँगकाँगचे 'द चेअरमन' आशियात नंबर वन!
यंदाच्या यादीत हाँगकाँगच्या 'द चेअरमन' या रेस्टॉरंटने आशियातील सर्वोत्तम रेस्टॉरंटचा मान पटकावला आहे. २०२१ नंतर दुसऱ्यांदा या हॉटेलने अव्वल स्थान गाठले आहे. याव्यतिरिक्त बँकॉकचे 'गगन' आणि सोलचे 'मिंगल्स' यांसारख्या प्रसिद्ध रेस्टॉरंट्सनी पहिल्या १० मध्ये स्थान मिळवले आहे. आशियातील खाद्यक्षेत्रात आपली ओळख निर्माण करण्यासाठी हे रँकिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
आशियातील सर्वोत्तम १० रेस्टॉरंट्स (२०२६)
१. द चेअरमन – हाँगकाँग, चीन२. विंग – हाँगकाँग, चीन३. गगन – बँकॉक, थायलंड४. मिंगल्स – सोल, दक्षिण कोरिया५. नुसारा – बँकॉक, थायलंड६. मीट द बंद – शांघाय, चीन७. शेफ टॅम्स सीझन्स – मकाऊ, चीन८. गगन ॲट लुई व्हिटॉन – बँकॉक, थायलंड९. लिंग लाँग – शांघाय, चीन१०. रु युआन – चीन
Web Summary : Two Indian restaurants, 'Masque' in Mumbai (15th) and 'NāR' in Himachal Pradesh (30th), have been recognized among Asia's 50 Best Restaurants. Hong Kong's 'The Chairman' tops the list.
Web Summary : मुंबई में 'Masque' (15 वें) और हिमाचल प्रदेश में 'नार' (30 वें) सहित दो भारतीय रेस्टोरेंट को एशिया के 50 सर्वश्रेष्ठ रेस्टोरेंट में मान्यता मिली है। हांगकांग का 'द चेयरमैन' शीर्ष पर है।