"प्रोमो शूट केला अन् न सांगता केलं रिप्लेस...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' कटू अनुभव, म्हणाली-"तेव्हा प्रचंड त्रास…"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 12:13 IST2026-05-07T12:01:58+5:302026-05-07T12:13:39+5:30
मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' कटू अनुभव, म्हणाली-"तेव्हा प्रचंड त्रास…"

"प्रोमो शूट केला अन् न सांगता केलं रिप्लेस...", मराठी अभिनेत्रीने सांगितला 'तो' कटू अनुभव, म्हणाली-"तेव्हा प्रचंड त्रास…"
Kunjika Kalwint On Replacement: एखादं नाटक, मालिका किंवा चित्रपटातून रिजेक्शन मिळणं तसेच एखाद्या कलाकृतीतून रिप्लेस करणं अशा अनेक प्रसंगाना कलाकारांना सामोरं जावं लागतं. अनेकदा कलाकार याबद्दल मोकळेपणाणे भाष्य करतात.अशातच मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा म्हणजेच अभिनेत्री म्हणजे कुंजिका काळविंटने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेले कटू अनुभव शेअर केले आहेत.
'ती परत आलीय', 'चंद्र आहे साक्षीला' तसेच 'स्वामिनी यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी नायिका म्हणजे कुंजिका काळविंट. तिने आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. दरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीत तिने अभिनय क्षेत्रातील तिच्या सुरूवातीच्या संघर्षकाळाबद्दल तसंच रिजेक्शनविषयी सांगितलं आहे. स्वामिनी या मालिकेतून कुंजिकाने टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. या मालिकेनंतर एका लीड रोलसाठी तिने ऑडिशन दिली होती. त्या शोमधून अभिनेत्रीला अचानक रिप्लेस करण्यात आलं.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, "जेव्हा मला समजलं की स्वामिनी मालिका बंद होत आहे, त्याचदरम्यान मी दुसरी एक ऑडिशन दिली होती. त्यात माझी लीड भूमिका होती. स्वामिनीमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्यामुळे सुरुवातीला टाईपकास्ट होण्याची भीती होती.पण, दुसऱ्या मालिकेसाठी लीड भूमिका मिळाली तेव्हा मी निश्चिंत होते. कारण, मला ती निगेटिव्ह इमेज बदलण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला असता. पण, काही कारणास्तव त्या गोष्टी जुळून आल्या नाहीत."
यापुढे कुंजिका म्हणाली, "मी त्या मालिकेसाठी प्रोमो सुद्धा शूट केला होता. पण,ते जुळलं नाही. त्यावेळी मला न सांगता रिप्लेस करण्यात आलं. तेव्हा मला प्रचंड त्रास झाला होता. त्यानंतर मी बराच वेळ घेतला की, आता मला लीड भूमिकाच करायच्या आहेत किंवा सकारात्मक भूमिकाच साकारायच्या आहेत, असंही मी ठरवलं होतं. पण, ते जुळून येत नव्हतं. त्यानंतर मग मला जाणवलं की, आता आपण जास्त वेळ घालवून चालणार नाही. कारण, मी आधीच इंडस्ट्रीत उशिरा आलेय. वयाच्या २७-२८ व्या वर्षी मी पहिली मालिका केली. त्यानंतर मला तेव्हा थांबून राहणं शक्य नव्हतं. कारण, कितीही नाही म्हटलं तरी मुलीचं वय हे दिसतंच."
तेव्हा मी ठरवलं...
"तेव्हा मी ठरवलं होतं,आता जे काम येईल ते घ्यायचं आणि भूमिका साकारायची. मग मी चंद्र आहे साक्षीला मालिका केली. त्याच्यानंतर मग लॉकडाऊन लागलं. मग ती परत आलीये मालिका केली. त्या मालिकेत सगळे कलाकार माझ्याच वयाचे होते आणि त्यातल्या बऱ्यापैकी लोकांना नाटक, मालिकांमध्ये काम केलं होतं, त्यामुळे त्यांच्याकडून मला खूप काही शिकता आलं." असं अभिनेत्रीने यावेळी सांगितलं.