फटाक्यांची आतिषबाजी अन् आईकडून औक्षण; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच अभिजीतचं जंगी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 11:33 IST2024-10-07T11:30:39+5:302024-10-07T11:33:56+5:30
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर येताच अभिजीतचं त्याच्या घरच्यांनी जंगी स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय.

फटाक्यांची आतिषबाजी अन् आईकडून औक्षण; 'बिग बॉस'मधून बाहेर येताच अभिजीतचं जंगी स्वागत
Abhijeet Sawant : 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन खूपच गाजला. या शोप्रमाणे त्यातील प्रत्येक स्पर्धकाची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली. बारामतीचा पठ्ठ्या सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरलाय तर इंडियन आयडॉल फेम अभिजीत सावंतने उपविजेतेपद पटकावलं. या लोकप्रिय गायकाने आपल्या गायनासोबत रंगतदार खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकली. आता 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर येताच अभिजीतचं त्याच्या घरच्यांनी जंगी स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय.
अभिजीत सावंतने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिजीतच्या स्वागतासाठी घरच्यांनी जोरदार तयारी केल्याचं दिसतंय. फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात त्याचं ग्रॅंड वेलकम करण्यात आलं. अभिजीत सावंतने सोशल मीडियावर हा पोस्ट करत भारावुन गेला आहे. शिवाय कॅप्शनमध्ये त्याने लिहलंय, "घरच्यांनी 'बिग बॉस' फत्ते करुन आलो त्याबद्दल इतकं जंगी स्वागत केलं!"
व्हिडीओमध्ये अभिजीत घरी पोहचताच त्याची आई लाडक्या लेकाचं औक्षण करत स्वागत करते. इतक्या दिवसानंतर आपल्या मुलाला भेटल्यानंतर अभिजीतला त्याची आई घट्ट मीठी मारते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. गायकाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये अभिजीतसोबत त्याच्या दोन चिमुकल्या मुली शिवाय मित्र-मंडळीही दिसते आहे. अभिजीत सावंतचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.