'बिग बॉस'मध्ये जाण्यापूर्वी शिव ठाकरेचा झालेला ब्रेकअप; 9 वर्ष होता रिलेशनशीपमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 09:08 IST2026-04-18T09:07:24+5:302026-04-18T09:08:23+5:30
Shiv thakare: शिवने त्याची एक्स गर्लफ्रेंड सध्या काय करते हेदेखील यावेळी सांगितलं.

'बिग बॉस'मध्ये जाण्यापूर्वी शिव ठाकरेचा झालेला ब्रेकअप; 9 वर्ष होता रिलेशनशीपमध्ये
मराठीसह हिंदी बिग बॉस गाजवणारा लोकप्रिय मराठमोळा चेहरा म्हणजे शिव ठाकरे. अनेक रिअॅलिटी शोच्या माध्यमातून वरचेवर प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या शिवने नुकतीच 'The 50' ची ट्रॉफी जिंकली. त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे. परंतु, सध्या शिव त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या ब्रेकअपविषयी भाष्य केलं आहे.
'फिल्मीज्ञान'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शिवने त्याच्या ९ वर्षांच्या रिलेशनशीपविषयी भाष्य केलं. विशेष म्हणजे बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वीच त्याचा ब्रेकअप झाला होता असंही यावेळी त्याने स्पष्टपणे सांगितलं. इतकंच नाही तर त्याची एक्स गर्लफ्रेंड सध्या काय करते यावरही तो व्यक्त झाला.
ब्रेकअपविषयी नेमकं काय म्हणाला शिव?
''कॉलेजमध्ये असतांना मी रिलेशनशीपमध्ये होतो. जवळपास ९ वर्ष माझं रिलेशन होतं. आणि, आता सुद्धा माझं जे रिलेशनशीप होतं ते अडीच-तीन वर्ष होतं. कॉलेजमध्ये असल्यापासून ते मी बिग बॉसमध्ये जाईपर्यंत मी या नात्यात होतो. पण, बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वीच माझा ब्रेकअप झाला आणि त्यानंतर तिचं लग्न झालं'', असं शिव म्हणाला.
या मुलाखतीमध्ये त्याला त्याच्या 'एक्स गर्लफ्रेंडचे फोन किंवा मेसेज येतात का?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, ''आता जे चाललंय ते ठीक आहे. तिचा फोन किंवा मेसेज येऊन काय करणार? जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतो. फक्त जे घडलंय त्या गोष्टींचा स्वीकार करुन पुढे जाणं फार कठीण असतं. मात्र, काही गोष्टी या आपल्या हातात नसतात. मी फार रोमँटिक माणूस आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात कोणी आलं तर मी त्या व्यक्तीवर फार प्रेम करतो. मात्र, एकतर्फी प्रेम मी कधीच करत नाही. प्रेम हे दोघांकडून पाहिजे. मी फार गिफ्ट्स वगैरे देतो. मला स्वयंपाक करता येत नाही. पण, मी इतर कामात नक्कीच मदत करु शकेन.''
दरम्यान, शिव ठाकरेने आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शो केले आहेत. यात 'एमटीव्ही रोडीज १५', खतरों के खिलाडी', 'झलक दिखला जा', 'बिग बॉस १६' यांसारख्या रियॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला असून बिग बॉस मराठीचा विजेताही ठरला आहे.