"गेटवर नाव महाराजांचं… पण समोरचं दृश्य लाजिरवाणं! "अंकिता वालावलकरनं व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 17:19 IST2025-07-28T17:19:18+5:302025-07-28T17:19:43+5:30

अंकितानं शेअर केलेला व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Ankita Walavalkar shared video raised questions on the garbage lying in front of Shivaji Maharaj Gate | "गेटवर नाव महाराजांचं… पण समोरचं दृश्य लाजिरवाणं! "अंकिता वालावलकरनं व्यक्त केला संताप

"गेटवर नाव महाराजांचं… पण समोरचं दृश्य लाजिरवाणं! "अंकिता वालावलकरनं व्यक्त केला संताप

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar)  'बिग बॉस मराठी ५' (Bigg Boss Marathi Season 5 ) मधून घराघरात लोकप्रिय झाली. मूळची कोकणातील असेलली अंकिता सामाजिक विषयांवर अनेकदा रोकठोक मते मांडताना दिसते. यावेळी अंकिता एका महत्त्वाच्या मुद्द्यावर थेट बोलताना दिसली. अंकितानं नुकताच नांदगावच्या प्रवेशद्वाराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या प्रवेशद्वाराला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं आहे. मात्र, त्या ठिकाणी साचलेला कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि घाण पाहून अंकितानं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अंकिता म्हणते, "जर कुणी म्हटलं की शिवाजी पार्कला अमुक-तमुक कार्यक्रम होतोय. तर आपण त्याला रागात म्हणतो की शिवाजी महाराज पार्क किंवा छत्रपती शिवाजी महाराज पार्क म्हणं. कारण, आपल्या मनामध्ये महाराजांबद्दल अभिमान, आदर आहे. त्यासाठी आपण हे सगळं करतो. पण, खरोखर आपण ते जपतो का ? आज जर महाराज असते तर ते या प्रवेशद्वारातून येऊ शकले असते का? आणि तुम्ही येऊ दिलं असतं का? आता मला काही जण म्हणतील तु जाऊन साफ कर ना. तर त्यांना मी सांगू इच्छिते कचरा न टाकणं किंवा कचरा न होऊ देणं, ही जबाबदारी आहे", असा अंकितानं म्हटलं. 

शिवाय, अंकितानं या व्हिडीओसोबत कॅप्शनमध्ये लिहलं, "गेटवर नाव महाराजांचं… पण समोरचं दृश्य लाजिरवाणं! एक लक्षात घ्या इतिहास फक्त पुस्तकांत नसतो, तो आपल्या आजुबाजूच्या जागांमध्येही असतो. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर आपल्या अस्मितेचं प्रतीक आहेत. त्यांच्या नावाचा उल्लेख जिथे होतो, तिथे आपोआपच अभिमान आणि आदराची भावना जागी होते. परंतु आज अनेक ठिकाणी "शिवाजी महाराज चौक", "शिवाजी महाराज गेट" अशा ऐतिहासिक नावांखाली असलेल्या जागांभोवती घाण, कचरा, निष्काळजीपणा आणि बेफिकिरीचं दु:खद चित्र दिसून येतं".

पुढे तिनं लिहलं, "किती विसंगती आहे ही, एकीकडे महाराजांचा जयघोष, दुसरीकडे त्यांच्या नावाजवळच साचलेला कचरा. हे फक्त त्या जागेचं नाही, तर आपल्या मानसिकतेचंही द्योतक आहे. शिवरायांच्या विचारांनी चालणं म्हणजे फक्त गड किल्ले बघणं नव्हे, तर स्वच्छता, शिस्त, आणि सजग नागरिकत्व हे त्यांच्या आदर्शाचं खरे अनुकरण आहे.
मग आपण रोज ज्या गेटखालून पाटीला नमस्कार करतो, तिथं जर आपणच प्लास्टिक, घाण, थुंकी आणि कचऱ्याचा ढीग ठेवत असू  तर तो नमस्कार केवळ दिखावा आहे का?" असा सवाल तिनं केला. 

आज गरज आहे ती फक्त "शिवप्रेम" बोलण्यात नसून, ते कृतीत दाखवण्याची. गेटवर महाराजांचं नाव,
पण समोर कचरा –
हा अपमान नाही का आपल्या इतिहासाचा? आपण जर खरंच शिवरायांवर प्रेम करत असू, तर त्यांच्या नावाने असलेल्या प्रत्येक स्थळाला म्हणजेच आपल्या महाराष्ट्राला स्वच्छ आणि सन्माननीय ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. समाज, नगरपालिका आणि स्थानिक नागरिक सर्वांनी मिळून हे लक्षात घ्यायला हवं. शिवरायांचं नाव म्हणजे शौर्य, स्वच्छता आणि स्वाभिमान. तो आपल्या कृतीनं दाखवूया! महाराजांच्या नावाने असलेल्या गेटसमोर कचरा दिसणं, हे आपण सर्वांनी विचार करावा अशी गोष्ट आहे.स्वतः कचरा न टाकणे आणि इतरांनाही रोखणे हीच खरी शिवप्रेमाची खरी ओळख", या स्पष्ट शब्दात तिनं आपलं मत मांडलं. या पोस्टमधून अंकितानं त्या ठिकाणी असलेली बेफिकिरी, निष्काळजीपणा आणि मानसिकता यावर खरमरीत टीका केली. अंकिताचं ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.


Web Title: Ankita Walavalkar shared video raised questions on the garbage lying in front of Shivaji Maharaj Gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.