लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्याचा घटस्फोट? लग्नाच्या ४ वर्षांनी नात्यात दुरावा आला, चाहत्यांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 15:00 IST2025-11-06T14:57:00+5:302025-11-06T15:00:50+5:30
ऐश्वर्याचा पतीही लोकप्रिय अभिनेता आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील या प्रसिद्ध जोडप्याने घटस्फोट घेतल्याची चर्चा असल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्याचा घटस्फोट? लग्नाच्या ४ वर्षांनी नात्यात दुरावा आला, चाहत्यांना धक्का
गेल्या काही दिवसांपासून सुयश टिळक-आयुषी भावे, योगिता चव्हाण-सौरभ चौघुले यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या ताज्या असतानाच टीव्हीवरील लोकप्रिय जोडी वेगळी होण्याची गोष्ट समोर येत आहे. 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेले कलाकार नील भट्ट (Neil Bhatt) आणि ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma) यांनी त्यांच्या लग्नाच्या अवघ्या चार वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही आता अधिकृतपणे घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असल्याची माहिती समोर येत आहे.
नील आणि ऐश्वर्याची भेट 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या सेटवर झाली होती. मालिकेत नीलने 'विराट चव्हाण' आणि ऐश्वर्याने 'पाखी'ची भूमिका केली होती. मालिकेदरम्यानच त्यांच्यात प्रेम फुलले आणि त्यांनी २०२१ मध्ये लग्न केलं. हे दोघे 'स्मार्ट जोडी' आणि 'बिग बॉस १७' या रिॲलिटी शोमध्येही दिसले होते, जिथे त्यांच्या जोडीला चाहत्यांनी खूप प्रेम दिले होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात तणाव असल्याची चर्चा होती आणि ते वेगळे राहत होते.

या वर्षी होळीनंतर या दोघांनी एकत्र सार्वजनिक ठिकाणी दिसणे किंवा सोशल मीडियावर फोटो पोस्ट करणे बंद केले होते. त्यामुळेच चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. परंतु आता दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. यंदा ऐश्वर्या आणि नीलने दिवाळीही एकमेकांसोबत साजरी न करता वेगळी साजरी केली. ऐश्वर्याने यापूर्वी अफवा पसरवू नका असे आवाहन केले असले तरी, आता या जोडप्याने कायदेशीररित्या वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.