शाळेत न जाण्याचा नातवाचा हट्ट, थलायवाने निभावली आजोबांची ड्यूटी! वर्गातील मुलंही शॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 15:47 IST2024-07-26T15:46:19+5:302024-07-26T15:47:06+5:30
रजनीकांत यांची लेक सौंदर्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत.

शाळेत न जाण्याचा नातवाचा हट्ट, थलायवाने निभावली आजोबांची ड्यूटी! वर्गातील मुलंही शॉक
'थलायवा' रजनीकांत (Rajinikanth) यांना वेगळ्या परिचयाची गरजच नाही. आपल्या हटके स्टाईलने त्यांनी संपूर्ण जगाला वेड लावलं. वयाच्या ७३ व्या वर्षीही ते एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे देत आहेत. असे हे थलायवा स्वत:च्या घरात नक्की कसे असतील याची झलक समोर आली आहे. शाळेत जायचं नाही म्हणून नाटक करणाऱ्या नातवाला ते स्वत:च शाळेत घेऊन जात आहेत. आजोबा-नातवाचा फोटो रजनीकांत यांची लेक सौंदर्याने शेअर केला आहे.
सौंदर्या रजनीकांतने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केलेत. पहिल्या फोटोत रजनीकांत कारमध्ये बसले आहेत. तर त्यांचा नातू चेहरा लपवून बाजूला बसला आहे. रजनीकांत हसतच त्याच्याकडे हात दाखवत आहेत. तर दुसरा फोटो नातवाच्या वर्गातला आहे. थलायवाला प्रत्यक्ष बघून वर्गातील इतर बच्चे कंपनीही खूश झालेली दिसत आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच सगळं काही सांगून जात आहे. रजनीकांत सर्व लहान मुलांशी संवादही साधत आहेत. या फोटोंसोबत सौंदर्याने लिहिले, "आज सकाळी माझ्या मुलाला शाळेत जाण्याची इच्छा नव्हती. प्रेमळ सुपरहिरो थाता स्वत: त्याला शाळेत घेऊन गेले. ऑनस्क्रीन असो किंवा ऑफस्क्रीन तुम्ही प्रत्येक भूमिकेत बेस्ट आहात डार्लिंग अप्पा."
रजनीकांत लवकरच वेट्टैयन सिनेमात दिसणार आहेत. सिनेमात अमिताभ बच्चन, राणा दगुबत्ती, फहाद फाजिल आणि मंजू वॉरियर यांचीही भूमिका आहे. याशिवाय ते लोकेश कनगराज यांच्या 'कूली'चंही शूट सुरु करणार आहेत.