राम चरणच्या मते 'हा' अभिनेता आहे सर्वात क्रेझी ड्रायव्हर, दोघे आहेत जिगरी मित्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 18:33 IST2026-01-22T18:28:08+5:302026-01-22T18:33:41+5:30
"तो वेडा ड्रायव्हर, पण सर्वात सुरक्षित" राम चरणने त्या अभिनेत्याच्या ड्रायव्हिंग स्किल्सचं केलं कौतुक

राम चरणच्या मते 'हा' अभिनेता आहे सर्वात क्रेझी ड्रायव्हर, दोघे आहेत जिगरी मित्र!
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'ग्लोबल स्टार' राम चरण सध्या त्याच्या आगामी 'पेड्डी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच अभिनेत्यानं एका शोमध्ये आपला जिवलग मित्र आणि सह-कलाकार ज्युनियर एनटीआर याच्या ड्रायव्हिंगबद्दल मोठा खुलासा केला आहे. २५० किमी/तास वेगाने धावणाऱ्या गाडीत कोणासोबत बसणे सुरक्षित वाटते, असे विचारले असता राम चरणने ज्युनियर एनटीआरचे नाव घेतले.
"कार्स विथ स्टार्स" या शोच्या दुसऱ्या सीझनच्या अंतिम फेरीत राम चरण पाहुणा म्हणून आला होता. यावेळी बोलताना तो म्हणाला, "मुळात मला कोणाच्याही शेजारी पॅसेंजर सीटवर बसायला आवडत नाही, मी स्वतः गाडी चालवणे पसंत करतो. पण जर मला कोणावर विश्वास ठेवायचा असेल, तर तो ज्युनियर एनटीआर आहे. तो एक वेडा ड्रायव्हर आहे. त्याच्यासोबत गाडीत बसताना मलाही एकदा विचित्र अनुभव आला होता, पण मला खात्री आहे की तो सर्वात सुरक्षित ड्रायव्हर आहे".
राम चरणने यावेळी असेही सांगितले की, त्याने अनेक मित्रांकडून एनटीआरच्या ड्रायव्हिंगचे भयानक किस्से ऐकले आहेत. तो म्हणाला, "असे खूप कमी अभिनेते आहेत ज्यांना वेगाने गाडी चालवण्याचा आनंद मिळतो आणि एनटीआर त्यापैकीच एक आहे". मात्र, या गप्पांदरम्यान राम चरणने अशा एका अभिनेत्याचे नाव घेण्यास स्पष्ट नकार दिला, ज्याच्या गाडीत तो चुकूनही बसणार नाही.
एस.एस. राजामौली यांच्या 'RRR' चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांनी एकत्र काम केले होते. पडद्यावरची त्यांची मैत्री खऱ्या आयुष्यातही तितकीच घट्ट आहे. राम चरण लवकरच 'पेड्डी' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.