'भारताचे एडिसन' असणाऱ्या जी.डी.नायडू यांच्यावर येतोय बायोपिक; 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 14:10 IST2025-10-27T14:07:26+5:302025-10-27T14:10:26+5:30
जी.डी. नायडू यांच्यावर सिनेमा येत असून त्यांच्या भूमिकेत प्रसिद्ध अभिनेता झळकणार आहे. या अभिनेत्याचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क झालेत

'भारताचे एडिसन' असणाऱ्या जी.डी.नायडू यांच्यावर येतोय बायोपिक; 'हा' अभिनेता प्रमुख भूमिकेत
भारताचे एडिसन अशी ओळख असणारे प्रसिद्ध संशोधक आणि उद्योजक जी. डी. नायडू (G. D. Naidu) यांच्या जीवनावर आधारित एक सिनेमा येणार आहे. या आगामी सिनेमाच्या घोषणेचा टीझर समोर आला आहे. विशेष म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता या सिनेमात नायडूंची भूमिका साकारणार आहे. या अभिनेत्याचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन बघून प्रेक्षक थक्क झाले आहेत. कोण आहे हा अभिनेता?
हा अभिनेता साकारणार नायडूंची भूमिका
दमदार अभिनयासाठी ओळखण्यात आलेला अभिनेता आर.माधवन या सिनेमात प्रमुख भूमिका साकारणार आहेय. या भूमिकेनुसार माधवनने केलेलं अविश्वसनीय ट्रान्सफॉर्मेशन बघून त्याचे चाहते थक्क झाले आहेत. 'रॉकेट्री: द नंबी इफेक्ट' या सिनेमानंतर माधवन आता पुन्हा एकदा 'जीडीएन' (GDN) या बायोपिकमध्ये एका वेगळ्याच रूपात दिसणार आहे. 'भारताचे एडिसन' म्हणून जी. डी. नायडूंना ओळख मिळाली. नायडूंच्या व्यक्तिमत्वातील अज्ञात पैलू या सिनेमातून उलगडण्यात येणार आहेत.
माधवनचा अप्रतिम फर्स्ट लुक
या आगामी सिनेमाचा फर्स्ट लुक टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये माधवनचा ट्रान्सफॉर्मेशन इतका प्रभावी आहे की, हाच माधवन आहे, हे ओळखणंही कठीण आहे. आर. माधवनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर हा टीझर शेअर करताना लिहिलं, "जी. डी. नायडू यांची ऊर्जा आता सर्वांसमोर आली आहे. ही कथा आहे एका अद्वितीय दृष्टिकोन, महत्त्वाकांक्षा आणि जिद्दीची. 'जीडीएन'चा फर्स्ट लुक टीझर सादर करताना आम्हाला अभिमान वाटतो."
माधवनचा हा नवीन लुक पाहून चाहते थक्क झाले आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर त्याचं कौतुक केले आहे. एका युजरने 'कमाल आहात तुम्ही मॅडी' अशी प्रतिक्रिया दिली, तर दुसऱ्याने, 'तुम्ही प्रत्येक वेळी आमच्या अपेक्षा उंचावता. आणखी एका दमदार कामाची प्रतीक्षा आहे,' असं लिहिलं. 'प्रत्येक नवीन चित्रपटात तुम्हाला ओळखणं कठीण होतं' अशा शब्दांत चाहत्यांनी माधवनच्या भूमिकेची प्रशंसा केली. या सिनेमात आर. माधवन सोबत प्रियामणी, जयराम आणि योगी बाबू यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.'जीडीएन' हा चित्रपट पुढील वर्षी २०२६ ला प्रदर्शित होणार आहे.