नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 08:55 IST2026-04-25T08:54:55+5:302026-04-25T08:55:39+5:30
संजय दत्तचा हा हिंस्त्र अवतार पाहून चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस

नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
'धुरंधर' आणि 'धुरंधर २' मधील एसीपी असलमच्या भूमिकेने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर, संजय दत्त आता आपल्या सर्वात गाजलेल्या 'खलनायक' अवतारात पुन्हा परतला आहे. संजय दत्तच्या 'खलनायक रिटर्न्स'चा टीझर प्रदर्शित झाला असून, तब्बल ३३ वर्षांनंतर 'बल्लू' पुन्हा एकदा पडद्यावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी बल्लूचा अंदाज पूर्वीपेक्षाही अधिक भयानक आणि खतरनाक दिसत असून, तो केवळ बदला घेण्याच्या उद्देशानेच बाहेर आला आहे. कसा आहे संजय दत्तचा 'खलनायक' लूक?
संजय दत्तने २४ एप्रिल रोजी 'खलनायक रिटर्न्स'ची अधिकृत घोषणा करत सोशल मीडियावर टीझर शेअर केला. हा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. टीझरमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि रक्तपात दाखवण्यात आला आहे. बल्लूच्या भूमिकेत असलेला संजय दत्त रक्ताने माखलेला असून त्याच्या चेहऱ्यावर काळीख लागलेली दिसते. जिओ स्टुडिओज या चित्रपटाची निर्मिती करत असून, त्यांनीच आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' मालिकेचीही निर्मिती केली होती.
टीझरची सुरुवातच आगीच्या लोण आणि मृतदेहांच्या ढिगाऱ्याने होते. आगीच्या मधोमध बेड्यांमध्ये अडकलेला एक हात दिसतो, जो बल्लूचा असतो. जखमी अवस्थेत पडलेल्या एका व्यक्तीजवळ बल्लू शांतपणे बसतो, त्या आगीनेच आपली सिगारेट पेटवतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचे क्रूर हावभाव स्पष्ट दिसतात. तो व्यक्ती जिवाची भीख मागत असताना बल्लू म्हणतो, "सांगितलं होतं ना? १० ऑक्टोबरला रात्री १० वाजता बल्लू जेलमधून फुर्र..." आणि त्यानंतर 'नायक नहीं खलनायक हूं मैं' हे गाणे गुणगुणत तो तिथून निघून जातो.
लांब केस, दाढी, डोळ्यात आग असा संजय दत्तचा भीतीदायक लूक आहे. हा हिंस्त्र अवतार पाहून चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युजरने म्हटले की, 'संजय दत्तचे आता स्वतःचे सिनेमॅटिक मल्टीव्हर्स तयार होत आहे'. तर काहींनी ही फिल्म आदित्य धरने दिग्दर्शित करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. 'आदित्य धरला मोठी स्टारकास्ट कशी हाताळायची हे चांगलं ठाऊक आहे, त्यामुळे जिओ स्टुडिओने त्यांनाच संधी द्यावी' अशी मागणी सोशल मीडियावर जोर धरत आहे.
'खलनायक रिटर्न्स' हा १९९३ मध्ये आलेल्या सुपरहिट 'खलनायक' चित्रपटाचा सीक्वेल आहे. मूळ चित्रपटात संजय दत्तसोबत माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. इन्स्पेक्टर राम (जॅकी श्रॉफ) आणि गंगा (माधुरी दीक्षित) यांनी बल्लूला पकडण्यासाठी रचलेले जाळे आणि त्यानंतर बल्लूचे हृदयपरिवर्तन अशी ती कथा होती. सुभाष घई दिग्दर्शित हा चित्रपट १९९३ मधील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता.
आता या सीक्वेलमध्ये माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांची झलक पाहायला मिळणार का, याबाबत अद्याप गुप्तता पाळण्यात आली आहे. मात्र, 'खलनायक रिटर्न्स'च्या या टीझरने जुन्या आठवणींना उजाळा दिला असून, 'बल्लू' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या ॲक्शन चित्रपटांपैकी एक ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.