रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 16:17 IST2026-04-28T16:17:01+5:302026-04-28T16:17:24+5:30
१ मे सुट्टीचा दिवस असल्याने ॲडव्हान्स तिकीट बुकिंगही जोरात सुरु आहे.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला 'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक सिनेमा १ मे रोजी महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होत आहे. सिनेमाचे ॲडव्हान्स बुकिंगही सुरू झाले आहे. सुरुवातीच्या आकडेवारीवरून रिलीजच्या आधीच सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. अजय-अतुलचं 'छत्रपती' अँथम साँग, छत्रपतींच्या भूमिकेत रितेश देशमुखचे संवाद, सर्व कलाकारांचे लूक्स यामुळे सिनेमा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्यातच १ मे सुट्टीचा दिवस असल्याने ॲडव्हान्स तिकीट बुकिंगही जोरात सुरु आहे.
ॲडव्हान्स बुकिंगचं स्टेटस
'सॅकनिल्क'च्या सुरुवातीच्या अहवालानुसार, 'राजा शिवाजी' चित्रपटाची आतापर्यंत १२.८ हजारांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. देशभरातील ७८९ शोसाठी ही नोंदणी झाली असून, चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत मोठी उत्सुकता आहे. ब्लॉक सीट्स वगळता चित्रपटाने आतापर्यंत ३२.९३ लाख रुपयांची कमाई केली आहे. मात्र, जर ब्लॉक सीट्सचा विचार केला, तर हा आकडा अंदाजे ५६.४७ लाख रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
अपेक्षेप्रमाणे या चित्रपटाला मराठी प्रेक्षकांकडून सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. मराठी २डी फॉरमॅटमध्ये ७४८ शोच्या माध्यमातून आतापर्यंत ३२.५२ लाख रुपये जमा झाले आहेत. मराठीत आतापर्यंत १२,६४० तिकिटांची विक्री झाली असून, तिकिटाचा सरासरी दर २३१ रुपये इतका आहे.
हिंदी भाषेतील प्रतिसाद
हा चित्रपट मराठीसोबतच हिंदीतही प्रदर्शित होत आहे. हिंदी भाषेसाठी ४१ शोमधून आतापर्यंत ४०,००० रुपयांची कमाई झाली असून, १६८ तिकिटांची विक्री झाली आहे. हिंदीत तिकिटाचा सरासरी दर १९६ रुपये आहे.
‘राजा शिवाजी’मध्ये हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची भूमिका आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते आणि जिनिलिया देशमुख यांसारख्या कलाकारांची मांदियाळी आहे. या कलाकारांच्या दमदार अभिनयासोबतच भव्य सेट्स, उत्कृष्ट तांत्रिक मांडणी, दमदार ॲक्शन सीन्स आणि प्रभावी दृश्यरचना यामुळे चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.