'राजा शिवाजी': 'ट्रेलर'पासून चर्चेत असलेला रितेशचा चित्रपट कसा आहे? का पाहायचा? वाचा रिव्ह्यू...

By संजय घावरे | Updated: May 1, 2026 17:15 IST2026-05-01T17:14:26+5:302026-05-01T17:15:14+5:30

'राजा शिवाजी'मधून रितेश देशमुखने मन जिंकलं? वाचा रिव्ह्यू

Raja shivaji movie review starring riteish deshmukh genelia sanjay dutt bhagyashree and many more actors | 'राजा शिवाजी': 'ट्रेलर'पासून चर्चेत असलेला रितेशचा चित्रपट कसा आहे? का पाहायचा? वाचा रिव्ह्यू...

'राजा शिवाजी': 'ट्रेलर'पासून चर्चेत असलेला रितेशचा चित्रपट कसा आहे? का पाहायचा? वाचा रिव्ह्यू...

Release Date: May 01,2026Language: मराठी
Cast: तेश देशमुख, जिनिलीया देशमुख, राहील-रियान देशमुख, संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, सचिन खेडेकर, महेश मांजरेकर, अमोल गुप्ते, भाग्रश्री, जितेंद्र जोशी, सुरेश विश्वकर्मा, सलमान खान, बोमण इराणी, फरदीन खान
Producer: ज्योती देशपांडे, जिनिलीया देशमुख, मुंबई फिल्म कंपनी, प्रस्तुतकर्ते - जिओ स्टुडिओजDirector: रितेश देशमुख
Duration: तीन तास सात मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

मराठीमध्ये बऱ्याच दिग्दर्शकांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवले, पण हा चित्रपट हिंदीतही बनल्याने शिवरायांचा पराक्रम सर्वदूर पोहोचणार आहे. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची यशोगाथा मांडताना दिग्दर्शक रितेश देशमुखने त्यापूर्वीची पार्श्वभूमी विस्ताराने दाखवली आहे. प्राजक्त देशमुख यांचे उच्च कोटीचे संवादलेखन आणि कलाकारांची अप्रतिम कामगिरी अखेरपर्यंत खिळवून ठेवते. 

कथानक : लखुजीराव जाधवांची हत्या, मुघल-आदिलशाही-निजामशाही यांच्या कचाट्यात अडकलेल्या जनतेवर होणारे जुलूम, लेकी-सुनांवर होणारे अत्याचार, मराठ्यांना मिळणारी गुलामरूपी वागणूक, शहाजीराजेंची हतबलता आणि एकूणच मराठी मुलूखावर होणाऱ्या परकीय आक्रमणानंतर कशा प्रकारे हिंदवी स्वराज्याचे बीज रुजले त्याची ही गोष्ट आहे. अफझल खान वधाने चित्रपटाचा शेवट होतो.

लेखन-दिग्दर्शन : सुरुवातीपासून कथानक वेगात पुढे सरकत उत्सुकता निर्माण करते. 'हे घरून निघताना कुंकवाचा करंडा सोबत घेऊनच निघाले आहेत', यांसारखे बरेच संवाद थेट मनाला भिडतात. मुघल, आदिलशाली, निजामशाही यांच्यातील राजकारण, शहाजीराजेंची चाकरी, शिवरायांचा जन्म, त्यांचे प्रशिक्षण, बंधूसोबतचे नाते, भगव्या झेंड्याचे महत्त्व, स्वराज्याची मुहूर्तमेढ आदी प्रसंग पहिल्या भागात आहेत. आजवर क्वचितच समोर आलेल्या शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजेंचा इतिहासही आहे. अफझल खानाची एन्ट्री ग्रँड असली तरी हत्तींची लढाई लुटूपुटूची वाटते. वाघनखांच्या वापराच्या संदर्भाकडे लक्ष देणे गरजेचे होते. कान्होजी जेधे यांची प्रतिज्ञा, सईबाईंचे निर्वाणीचे बोलणे, शिवराय आणि त्यांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्यातील बंधूप्रेम असे काही प्रसंग भावूक करतात. पार्श्वसंगीत प्रभावी आहे.

अभिनय :रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. त्याला जिनिलीयाने चांगली साथ दिली आहे. राहील-रियान यांचा पहिलाच प्रयत्न आहे. संजय दत्तच्या रूपातील अफझल खान हृदयात धडकी भरवतो. विद्या बालनने साकारलेली बडी बेगमही लक्षात राहते. संभाजीराजेंच्या व्यक्तिरेखेत अभिषेक बच्चन आपला ठसा उमटवण्यात यशस्वी ठरला आहे. शहाजीराजांच्या भूमिकेत सचिन खेडेकर शोभून दिसतात. भाग्यश्रीने साकारलेल्या जिजाऊंच्या भूमिकेत करारी बाणा जाणवत नाही. अमोल गुप्तेंनी मदमस्त आदिलशाह छान रंगवला आहे. पंतांच्या छोट्याशा भूमिकेत जितेंद्र जोशीने चांगली कामगिरी केली आहे. अंगरक्षक जीवा महालाच्या रूपात सलमान खानची एन्ट्री टाळ्या-शिट्या मिळवणारी आहे. महेश मांजरेकर, फरदीन खान, अशोक समर्थ, सुरेश विश्वकर्मा आदी सर्व कलाकारांनी लहान-सहान व्यक्तिरेखांमध्येही जीव ओतला आहे. 

सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, ऐतिहासिक प्रसंग, दिग्दर्शन, अभिनय, गीत-संगीत, सिनेमॅटोग्राफी, कोरिओग्राफी, वातावरण निर्मिती

नकारात्मक बाजू : काही ऐतिहासिक संदर्भांची मांडणी, वाघनखांचा वापर, सय्यद बंडावर जीवा महालाच्या हल्ल्याचा प्रसंग

थोडक्यात काय तर इतिहासाची पाने मोठ्या पडद्यावर उलडताना पाहण्यासाठी हा चित्रपट बघायला हवा. शिवरायांच्या पराक्रमाची यशोगाथा एका चित्रपटात मावणारी नसल्याने 'राजा शिवछत्रपती' या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे.

Web Title: Raja shivaji movie review starring riteish deshmukh genelia sanjay dutt bhagyashree and many more actors