रणवीर सिंह महादेवाच्या भूमिकेत दिसणार नाही! लेखक अमिश त्रिपाठींनी केलं स्पष्ट; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 16:28 IST2026-05-12T16:27:51+5:302026-05-12T16:28:34+5:30
अमिश त्रिपाठी काय म्हणाले?

रणवीर सिंह महादेवाच्या भूमिकेत दिसणार नाही! लेखक अमिश त्रिपाठींनी केलं स्पष्ट; म्हणाले...
'धुरंधर' या चित्रपटाच्या तुफान यशानंतर अभिनेता रणवीर सिंह आता महादेवाच्या भूमिकेत दिसणार अशी बातमी आज आली होती. अमिश त्रिपाठी यांच्या 'द इमॉर्टल्स ऑफ मेलुहा' या पुस्तकावर आधारित चित्रपटात भगवान शिव यांची भूमिका साकारणार असल्याची चर्चा रंगली. रणवीरने या प्रोजेक्टचे हक्क स्वतः विकत घेतल्याचेही बोलले जात होते. मात्र, आता या सर्व चर्चांवर स्वतः लेखक अमिश त्रिपाठी यांनी पूर्णविराम लावला असून या बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.
'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत अमिश त्रिपाठी म्हणाले, "शिव ट्रिलॉजीचे सर्व हक्क अजूनही माझ्याकडेच सुरक्षित आहेत. मी अद्याप कोणत्याही अभिनेत्याशी किंवा प्रोडक्शन हाऊसशी कोणताही करार केलेला नाही. मी रणवीर सिंहचा खूप मोठा चाहता आहे आणि त्याचा आदर करतो, पण तो या प्रोजेक्टचा भाग आहे ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे." यामुळे रणवीरच्या चाहत्यांचा काहीसा हिरमोड झाला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, गेल्या काही वर्षांत अनेक दिग्गज निर्मात्यांनी अमिश यांच्या 'शिव ट्रिलॉजी'वर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. २०१४ मध्ये करण जोहरने याचे हक्क विकत घेतले होते, मात्र पुढे काहीच हालचाल झाली नाही. त्यानंतर संजय लीला भन्साळी आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या नावांचीही चर्चा झाली, पण हे सर्व प्रोजेक्ट्स थंडबस्त्यातच राहिले.
रणवीर सिंह सध्या आपल्या इतर आगामी चित्रपटांच्या तयारीत व्यस्त आहे. यामध्ये आदित्य धर यांचा नवा चित्रपट आणि जय मेहता दिग्दर्शित 'प्रलय' यांसारख्या मोठ्या प्रोजेक्ट्सचा समावेश आहे. रणवीर 'मेलुहा'मध्ये भगवान शिवाच्या रूपात दिसणार नसल्याचे आता स्पष्ट झाले असले तरी, या भूमिकेसाठी अमिश त्रिपाठी भविष्यात कोणाची निवड करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.