Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका

By ऋचा वझे | Updated: September 27, 2024 16:53 IST2024-09-27T16:45:18+5:302024-09-27T16:53:16+5:30

प्रियाने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. सीरिज नक्की कशावर आहे, यात प्रियाची काय भूमिका आहे वाचा.

Priya Bapat new hindi series Raat Jawaan Hai also starring Barun Sobti and Anjali Anand | Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका

Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका

प्रिया बापट (Priya Bapat ) विविधांगी भूमिकांमध्ये दिसणारी अभिनेत्री आहे. नाटक, मालिका, सिनेमा, आणि आता सीरिज अशा सर्वच क्षेत्रात ती आपल्या अभिनयाची छाप पाडत आहे. प्रियाची 'सिटी ऑफ ड्रीम्स' ही हिंदी सीरिज खूप गाजली. सीरिजचे ३ सीझनही आले आणि आता चौथ्या सीजनची प्रेक्षक वाट पाहत आहेत. दरम्यान प्रिया आणखी एका हिंदी सीरिजमधून भेटीला येत आहे. सुमीत व्यास दिग्दर्शित 'रात जवां है' मध्ये ती झळकणार आहे. सीरिज नक्की कशावर आहे, यात प्रियाची काय भूमिका आहे वाचा.

'लोकमत फिल्मी' ला दिलेल्या मुलाखतीत प्रिया बापटने 'रात जवां है' सीरिजबद्दल माहिती दिली. ती म्हणाली, "मी सुमन या भूमिकेत आहे. ही तीन मित्रांची गोष्ट आहे जे लहानपणापासून सोबत आहेत.  तसंच आता तिघंही आपापल्या आयुष्यात पालकत्वाचा अनुभव घेत आहेत. पण मुलांचा सांभाळ करता करता त्यांना स्वत:ला वेळच देता येत नाही. पुन्हा मित्र म्हणून एकमेकांना भेटायचं, मजा करायची यासाठी ते प्रयत्न करत असतात. यात त्यांची मैत्री कशी टिकते, त्यांचं पुढे काय होतं याची ही गंमतीशीर गोष्ट आहे."


ती पुढे म्हणाली, "सुमन हे पात्र माझ्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं आहे. माझ्या प्रत्येक भूमिकेची मतं ठाम होती. पण यात सुमन मनात ठेवणारी, मोजकंच बोलणारी अशी आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अशी भूमिका करणं माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. तसंच सुमीत व्यास या इतक्या हुशार अभिनेता-दिग्दर्शकासोबत काम करता आलं याचा मला खूप आनंद आहे. बरुण आणि अंजली यांच्यासोबत मी पहिल्यांदाच काम केलं. मी त्यांना ओळखत नव्हते. पण दोघंही खूप चांगली माणसं आहेत. खऱ्या आयुष्यातही आता आमची मैत्री झाली आहे."

'सिटी ऑफ ड्रीम्स' बद्दल प्रिया म्हणाली, "सीरिजचा पुढचा सीझन कधी येईल याची खरंच कल्पना नाही. पुढचा पार्ट आला तर मला नक्कीच आनंद होईल. कारण सिटी ऑफ ड्रीम्स ची माझी अत्यंत लाडकी टीम आहे. ते सगळेच लोक खूप छान आणि जवळचे आहेत. तसंच या सीरिजने मला हिंदीत ब्रेक दिला त्यामुळे ती सीरिज नक्कीच माझ्यासाठी महत्वाची आहे."

११ ऑक्टोबरला 'रात जवां है' सीरिज सोनी लिव्ह वर प्रदर्शित होणार आहे. यामध्ये प्रिया बापट, बरुण सोबती आणि अंजली आनंद यांची मुख्य भूमिका आहे. 'पर्मनंट रुममेट्स' फेम सुमीत व्यासने सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. 

Web Title: Priya Bapat new hindi series Raat Jawaan Hai also starring Barun Sobti and Anjali Anand