Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:32 IST2026-05-08T13:11:45+5:302026-05-08T13:32:10+5:30

Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेही गुरुवारी राष्ट्रीय महिला आयोगासमोर (NCW) हजर झाली. यावेळी तिने माफी मागत स्पष्ट केलं की, कोणाच्याही भावना दुखावण्‍याचा तिचा कोणताही हेतू नव्हता.

कन्नड चित्रपट 'केडी द डेविल' मधील 'सरके चुनर' या गाण्यातील परफॉर्मन्समुळे वादात सापडलेली अभिनेत्री नोरा फतेही गुरुवारी राष्ट्रीय महिला आयोगासमोर (NCW) हजर झाली. यावेळी तिने माफी मागत स्पष्ट केलं की, कोणाच्याही भावना दुखावण्‍याचा तिचा कोणताही हेतू नव्हता.

आयोगासमोर आपली बाजू मांडताना नोराने केवळ आपली चूकच मान्य केली नाही, तर भविष्यासाठी एक मोठा निर्णयही घेतला. आयोगाच्या कार्यालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना तिने सांगितलं की, तिचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणं किंवा महिलांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडणं असा नव्हता.

नोरा म्हणाली, "नकळतपणे माझ्याकडून ही चूक झाली. एक कलाकार म्हणून मी माझी जबाबदारी स्वीकारते. माझ्या कृत्याबद्दल मी माफी मागते, कोणालाही त्रास देण्याचा माझा हेतू नव्हता. मी एका अशा परिस्थितीत अडकले होते जिथे गोष्टी वादग्रस्त ठरल्या. एक कलाकार म्हणून मी जबाबदार असायला हवी, म्हणूनच मी मनापासून माफी मागते."

महिला आयोगाच्या सदस्यांचे आभार मानताना ती म्हणाली की, आयोगाने तिचं म्हणणं अत्यंत संवेदनशीलतेने आणि दयाळूपणे ऐकून घेतलं. नोरा पुढे म्हणाली, "आमच्यात सकारात्मक चर्चा झाली आणि सर्व गोष्टी लेखी स्वरूपात पूर्ण झाल्या आहेत.”

“आता मी ठरवलं आहे की, आपण समाजासाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. याच विचारातून मी काही अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. धन्यवाद."

यापूर्वी याच प्रकरणात २७ एप्रिल रोजी संजय दत्त देखील महिला आयोगासमोर हजर झाला होता. सुनावणी दरम्यान संजय दत्तनेही आयोगाची माफी मागितली होती आणि समाजकल्याण तसेच महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पाऊल टाकत ५० आदिवासी मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणा केली.

'केडी द डेविल' या चित्रपटातील 'सरके चुनर' हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर लोकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत होती. अनेकांनी आरोप केला होता की, अशा प्रकारची गाणी अश्लीलतेला खतपाणी घालतात, तर काहींनी कलाकारांच्या सामाजिक जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

वाढता वाद पाहून आयोगाने नोरा फतेहीला नोटीस पाठवून प्रत्यक्ष हजर राहून स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. राष्ट्रीय महिला आयोगाने या गाण्याबाबतच्या तक्रारींची दखल घेत सुनावणी निश्चित केली होती.

या गाण्याचे बोल, व्हिडीओ आणि परफॉर्मन्सवर काही संघटना आणि महिला गटांनी आक्षेप घेतला होता. हे गाणं महिलांच्या प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याचं म्हटलं गेलं होतं. या वादानंतरच नोरा फतेहीला समन्स बजावण्यात आलं होतं, ज्याला प्रतिसाद देत ती गुरुवारी सकाळी ११:३० वाजता आयोगासमोर उपस्थित राहिली.