'मुलांना भारतीय शाळेत कधीच पाठवलं नाही कारण ...' सुनील शेट्टीने स्पष्ट सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 11:06 AM2023-07-03T11:06:53+5:302023-07-03T11:21:52+5:30

सुनील शेट्टीची दोन्ही मुलं अमेरिकन बोर्डमध्ये शिकली आहेत.

बॉलिवूडमध्ये सर्वांचा लाडका अण्णा म्हणजेच अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) 'फॅमिली मॅन' म्हणूनही ओळखला जातो. त्याने करिअरसोबतच स्वत:चं वैयक्तिक आयुष्यही उत्तमरित्या सांभाळले. बॉलिवूडमध्ये तर त्याचा सर्वचजण आदर करतात शिवाय सामान्य जनताही एक माणूस म्हणून त्याची चाहती आहे.

सुनील शेट्टीने नुकतंच एक असं वक्तव्य केलंय जे आता चांगलंच चर्चेत आहे. सुनील आणि पत्नी माना शेट्टीला अथिया आणि अहान ही दोन मुलं आहेत. मुलगी अथियाचं नुकतंच भारतीय क्रिकेटपटू के एल राहुलसोबत थाटामाटात लग्न झाले.

आता सुनीलने दोन्ही मुलांच्या शिक्षणाबाबतीत वक्तव्य केलंय. दोघांना भारतीय शाळांमध्ये न पाठवण्याचं आधीच ठरवलं होतं असं त्याने सांगितलं. सुनील शेट्टीने पहिल्यांदाच असं लोकांच्या भावनांना ठेच पोहोचणारं वक्तव्य केलं असेल. पण तो असं का म्हणाला हे त्याने स्पष्ट केलं आहे.

सुनील शेट्टीने दोन्ही मुलांचं शिक्षण भारतीय बोर्डमध्ये नाही तर अमेरिकन बोर्डमध्ये केलं. तो म्हणाला,'मी हे ठरवलं होतं की मी माझ्या मुलांना भारतीय शाळेत दाखल करणार नाही तर ज्या शाळेचं नेतृत्व अमेरिकन बोर्ड करतं त्या शाळेत पाठवण्याचं ठरवलं. कारण त्यांना कोणी विशेष वागणूक द्यावी असं मला नको होतं.'

तो पुढे म्हणाला,'त्यांना मला अशा जगात पाठवायचं होतं जिथे ते नेमके कोण आहेत याचा कोणाला फरकच पडला नाही पाहिजे. याचा फायदाही झाला. मला आठवतंय की माझे वडील म्हणाले होते यात खूप खर्च येईल. पण मी त्यांना तयार केलं.'

सुनील शेट्टीने कधीच मुलांना अभिनय क्षेत्रात येण्यासाठी प्रेरित केलं नाही. उलट अथियाने शिक्षण सुरु असतानाच अभिनेत्री बनायची इच्छा असल्याचं वडिलांना सांगितलं. म्हणून नंतर तिने न्यूयॉर्क फिल्म अॅकॅडमीत प्रवेश घेतला.

अथिया शेट्टीला खरं तर आधी अटलांटाच्या शाळेत शिक्षणासाठी पाठवलं जाणार होतं. सुनील शेट्टीने पूर्ण तयारीही केली होती. मात्र विमानतळावरच तिने वडिलांसमोर अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सुनील शेट्टीने तिला फिल्मइंडस्ट्रीचं वास्तव सांगितलं होतं. या क्षेत्रात अपयश पचवण्याची ताकद आहे का असंही विचारलं होतं.

अथियाने पुढे 2015 मध्ये 'हीरो' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सूरज पांचोलीसह तिने स्क्रीन शेअर केली. आदित्या पांचोलीचा मुलगा सूरज पांचोलीचाही हा पहिलाच सिनेमा होता. तर अथियाचा भाऊ अहान शेट्टीने तारा सुतारियासह 'तडप' सिनेमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.