प्रेमासाठी सोडलं करिअर, कोट्यधीश पती अन् दोन मुलांसह संसारात रमली माजी 'मिस इंडिया'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 06:21 PM2024-02-04T18:21:26+5:302024-02-04T18:32:46+5:30

मराठमोळी अभिनेत्री जेव्हा दाक्षिणात्य अभिनेत्याच्या प्रेमात पडली.

'वास्तव','पुकार','जब प्यार किसी से होता है' सारख्या सिनेमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी ही अभिनेत्री एकाएकी सिनेसृष्टीतून गायब झाली. करिअरच्या उच्च शिखरावर असतानाच ती दाक्षिणात्य अभिनेत्याच्या प्रेमात पडली आणि घर संसारात रमली.

त्या अभिनेत्रीचं नाव आहे नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar). मराठमोळी नम्रता गेल्या अनेक वर्षांपासून साऊथमध्येच रमली आहे. साऊथ सुपरस्टार महेशबाबूशी लग्न केल्यानंतर ती कायमची तिकडेच स्थायिक झाली. हिंदी फिल्म इंडस्ट्री आणि चाहते आजही तिची आठवण काढतात.

मराठमोळी नम्रताने तिच्या सौंदर्याने सर्वांनाच घायाळ केलं होतं. 1993 साली तिने फेमिना मिस इंडिया खिताब पटकावला. यानंतर तिने मिस युनिव्हर्समध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले ज्यात ती सहाव्या स्थानावर होती.

1977 साली नम्रताने शत्रुघ्न सिन्हा यांच्या 'शिर्डी के साईबाबा' सिनेमात बालकलाकाराची भूमिका साकारली. नम्रता खरं तर अक्षय कुमारसोबत एका सिनेमातून डेब्यू करणार होती पण तो सिनेमा रिलीजच होऊ शकला नाही. यानंतर 1998 साली तिने सलमान खानच्या 'जब प्यार किसी से होता है' सिनेमात छोटी भूमिका साकारली.

नम्रताला खरी ओळख मिळाली ती 'वास्तव' सिनेमातून. संजूबाबाच्या तोडीस तोड काम तिने केले. याशिवाय 'अलबेला','तेरा मेरा साथ रहे','दिल विल प्यार व्यार' सारख्या हिंदी सिनेमात ती दिसली. दाक्षिणात्य सिनेमांमध्येही तिने काम केले.

2000 साली तिची भेट प्रिन्स ऑफ टॉलिवूड म्हणून ओळख असलेल्या महेशबाबूशी (Mahesh Babu) झाली. एका सिनेमात ते एकत्र काम करत होते. त्यांनी डेटिंग करायला सुरुवात केली. बरेच वर्ष त्यांनी आपलं नातं जगापासून लपवलं.

5 वर्ष डेट केल्यानंतर 2005 साली दोघंही लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर तिने सिनेमांमध्ये काम करणं सोडून दिलं. तिने कुटुंबाकडेच लक्ष द्यावं अशी महेशबाबूची इच्छा होती असं तिने काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

लग्नानंतर नम्रता हैदराबाद येथे शिफ्ट झाली. तिला एक मुलगा आणि एक मुलही आहे. आपल्या मुलांसोबत ती कायम फोटो शेअर करत असते. शिवाय ती आजही 'ब्युटी क्वीन'च दिसते.

नम्रता शिरोडकरची सख्खी बहीण सिनेसृष्टीत काम करते.तिचं नाव शिल्पा शिरोडकर. शिल्पाने अनेक हिंदी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. शिवाय तिने हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. शिल्पा कायम बहीण आणि भाच्यांसोबत सोशल मीडियावर फोटो शेअर करते.