"२ तासांत दीड कोटी द्या, तरच मिळेल जामीन"; अभिनेता राजपाल यादवला हायकोर्टाची डेडलाईन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 14:00 IST2026-02-16T13:59:45+5:302026-02-16T14:00:21+5:30
दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवच्या वकिलाला अंतरिम जामिनासाठी प्रतिवादीच्या नावाने १.५ कोटी रुपयांचा डीडी सादर करण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे.

"२ तासांत दीड कोटी द्या, तरच मिळेल जामीन"; अभिनेता राजपाल यादवला हायकोर्टाची डेडलाईन
नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवच्या जामीन याचिकेवर दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी झाली. त्यात १ वाजताच्या सुनावणीत न्या. स्वर्णकांता शर्मा यांनी अभिनेत्याच्या वकिलाला २ तासांची मुदत दिली आहे. तुमच्याकडे ३ वाजेपर्यंत वेळ आहे. जर पुढील २ तासांत दीड कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जमा केला तर आजच जामीन होईल अन्यथा यावर मंगळवारी सुनावणी घेतली जाईल असं कोर्टाने राजपाल यादवच्या वकिलांना सांगितले आहे.
राजपाल यादवच्या वकिलांनी सोमवारी सुनावणीला सुरुवात होताच कोर्टात सांगितले की, आमची विनाअट FDR च्या माध्यमातून १.५० कोटी देण्याची तयारी आहे त्यावर न्यायाधीशांनी जर तुम्हाला आधीच माहिती होते तर तुमच्याकडे एक डिमांड ड्राफ्ट असायला हवा होता असं म्हटले. त्याशिवाय प्रतिवादीच्या नावाने २५ लाख रुपयांचा डीडी आधीच जारी करण्यात आला आहे आणि राजपाल यादवने ७५ लाख रुपयांचा डीडी आधीच जमा केला आहे. उर्वरित डीडी म्हणजे १.५ कोटी रुपये शिल्लक आहेत असंही न्यायालयाने नमूद केले. जर दुपारी ३ पर्यंत तुम्ही पैसे जमा केले तर आम्ही तुम्हाला जामीन देऊ, जर नाही केले तर मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी होईल असं कोर्टाने स्पष्ट सांगितले.
दिल्ली उच्च न्यायालयाने राजपाल यादवच्या वकिलाला अंतरिम जामिनासाठी प्रतिवादीच्या नावाने १.५ कोटी रुपयांचा डीडी सादर करण्यासाठी दुपारी ३ वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. "जर तुम्ही सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत तो डीडी सादर केला तर आम्ही तुम्हाला सोडू. जर तसे केले नाही तर आम्ही उद्या (मंगळवार) सकाळी या खटल्याची सुनावणी करू." खटला दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात येत आहे असं न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांनी सांगितले. याआधीही राजपाल यादवच्या वकिलांनी हायकोर्टात २.५ कोटी रुपये टप्प्याटप्प्याने तक्रारदाराला देऊ असं कबूल केले होते. परंतु कोर्टाने दिलेल्या निर्धारित वेळेत ही रक्कम देण्यात ते अयशस्वी ठरले होते. त्यामुळे कोर्टाने फटकारल्यानंतर ५ फेब्रुवारीला राजपाल यादवला जेलला जावे लागले होते.
काय आहे प्रकरण?
९ कोटींचे कर्ज आणि चेक बाऊंन्स प्रकरणी अभिनेता राजपाल यादव सध्या तिहारच्या जेलमध्ये बंद आहे. १२ फेब्रुवारीला हायकोर्टाने ७ चेक बाऊन्स प्रकरणी त्याचा जामीन फेटाळला होता. अभिनेत्याच्या वकिलाने मागणी केल्यानंतर १६ फेब्रुवारीपर्यंत हे प्रकरण टाळले होते. राजपाल यादवला एका कौटुंबिक विवाह सोहळ्यात हजेरी लावायची असल्याने त्यांना अंतरिम जामीन मिळावा अशी मागणी त्यांनी कोर्टात केली. मात्र कोर्टाने आजच्या सुनावणीत राजपाल यादवला २ तासांची मुदत दिली आहे.