"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 10:38 IST2026-04-14T10:38:05+5:302026-04-14T10:38:30+5:30
आशाताई रुग्णालयात असताना मुमताज भेटायला गेल्या होत्या, पण...

"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी, १३ एप्रिल रोजी त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने केवळ त्यांचे कुटुंबच नव्हे, तर चित्रपटसृष्टीतील त्यांचे जुने सहकारी आणि मित्रपरिवारही शोकाकुल आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मुमताज यांना आशा भोसलेंच्या शेवटच्या क्षणांची आठवण सांगितली आहे.
आशाताईंच्या निधनानंतर त्यांची जवळची मैत्रीण आणि दिग्गज अभिनेत्री मुमताज यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणांबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना मुमताज भावूक झाल्या."आशाताई रुग्णालयात असल्याचे समजताच मी तातडीने त्यांना भेटायला गेले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने संवाद होऊ शकला नाही. मी रुग्णालयातून बाहेर पडले आणि काही वेळातच त्यांच्या निधनाचा निरोप आला," असे मुमताज यांनी जड अंतःकरणाने सांगितले.
मुमताज आणि आशा भोसले यांचे नाते खूप जुने आणि जिव्हाळ्याचे होते. मुमताज या लता मंगेशकर आणि आशाताईंच्या शेजारीच राहत होत्या. त्यामुळे त्यांचे एकमेकींच्या घरी हक्काने येणे-जाणे असायचे. आशाताईंच्या पार्थिवाचे दर्शन घेतल्यानंतर मुमताज म्हणाल्या की,'निधनानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज (नूर) जाणवत होते.' मुमताज यांच्या करिअरमधील अनेक गाणी आशाताईंनी गायली होती. ज्यामुळे मुमताज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या.
सात दशकांहून अधिक काळ आपल्या आवाजाने मोहिनी घालणाऱ्या आशाताईंनी २० भाषांमध्ये १२,००० हून अधिक गाणी गायली आहेत. त्यांच्या या अफाट कार्याची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्येही घेण्यात आली आहे. ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या त्या पहिल्या भारतीय गायिका होत्या. त्यांनी चित्रपटसृष्टीतील अनेक पिढ्यांसाठी गाणी गायली असून, त्यांच्या निधनाने भारतीय संगीताचा अमूल्य हिरा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.