जिथे शिकला त्याच कॉलेजने २५ वर्षांनी केला प्रसाद ओकचा गौरव, अभिनेता सर्वांसमोर नतमस्तक; म्हणतो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:36 IST2025-02-11T15:36:10+5:302025-02-11T15:36:28+5:30
प्रसादला त्याच्या कॉलेजमधून विशेष पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

जिथे शिकला त्याच कॉलेजने २५ वर्षांनी केला प्रसाद ओकचा गौरव, अभिनेता सर्वांसमोर नतमस्तक; म्हणतो...
प्रसाद ओक हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेल्या प्रसादने मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर कलाविश्वात नाव कमावलं. प्रसाद ओकेने अनेक मराठी मालिका, नाटक आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या प्रसादला अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलं आहे. प्रसादला त्याच्या कॉलेजमधून विशेष पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
प्रसादने बृहन् महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स(BMCC) या कॉलेजमधून शिक्षण घेतलं आहे. ज्या कॉलेजमध्ये प्रसाद शिकला त्या कॉलेजकडून अभिनेत्याचा गौरव करण्यात आला आहे. "BMCC हे माझं कॉलेज… pass out झाल्यानंतर २५ वर्षांनी #PRIDEOFBMCC हा पुरस्कार स्वीकारताना खरंच गहिवरून आलं होतं. मला मिळालेल्या सर्वोच्च सन्मानांपैकी हा एक सन्मान आहे, असं मला मनापासून वाटतं. ज्या मातीत आपण घडलो, ज्या वास्तूत आपण शिकलो, तिथे हा सन्मान मिळणं म्हणजे आईने दिलेली शाबासकी आहे. मला या पुरस्कारायोग्य समजल्याबद्दल कॉलेज चे, सर्व प्राध्यापकांचे आणि माजी विद्यार्थी समिती चे मनःपूर्वक आभार…!!!", असं प्रसादने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
प्रसादने त्याचा हा पुरस्कार त्याच्या कॉलेजमधील एका मित्राला समर्पित केला आहे. "माझा कॉलेज मधला एक अत्यंत जवळचा मित्र...गिरीश आठल्ये. जो एका दुर्दैवी अपघातात गेला. ज्याने मला वारंवार या क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. हा पुरस्कार मी त्यालाच समर्पित करतो. I miss u गिऱ्या…!!!", असं म्हणत प्रसादने आभार व्यक्त केले आहेत.