कान्स गाजवून प्राजक्ता माळी मायदेशात परतली; विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 15:30 IST2026-05-19T15:30:31+5:302026-05-19T15:30:53+5:30
कान्स गाजवल्यानंतर आता प्राजक्ता नुकतीच मुंबईत परतली आहे.

कान्स गाजवून प्राजक्ता माळी मायदेशात परतली; विमानतळावरील व्हिडीओ व्हायरल
फ्रान्समध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल' (Cannes Film Festival) मध्ये लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आपल्या मराठमोळ्या सौंदर्याची भुरळ पाडली. ती पारंपरिक लूकमध्ये कान्सच्या रेड कार्पेटवर उतरली. तिच्या कान्स डेब्यूचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले आहेत. कान्स गाजवल्यानंतर आता प्राजक्ता नुकतीच मुंबईत परतली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिचे आगमन होताच पापाराझींच्या कॅमेऱ्यात ती कैद झाली.
'कान्स'च्या रेड कार्पेटवर आपल्या हटके फॅशनने सगळ्यांना थक्क केल्यानंतर, विमानतळावर उतरताच प्राजक्ताचा एक कम्फर्टेबल लूक पाहायला मिळाला. जीन्स, शर्ट आणि डोक्यावर कॅप असा लूक तिनं केला होता. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील नेहमीच्याच मनमोहक हसूने चाहत्यांना भुरळ घातली. विमानतळावरून बाहेर पडताना तिने पापाराझींना हसून पोझ दिल्या आणि तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
यंदाच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये प्राजक्ता माळीच्या लूकची प्रचंड चर्चा झाली. तिने पाश्चिमात्य फॅशनला मराठमोळा तडका देत आंतरराष्ट्रीय मंचावर मराठी संस्कृतीचे प्रतिनिधित्व केले होते. मराठी भाषेला मिळालेल्या 'अभिजात दर्जा'च्या पार्श्वभूमीवर, कान्स फेस्टिव्हलमध्ये 'भारत पॅव्हेलियन' अंतर्गत एका विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या जागतिक मंचावर 'अभिजात मराठी'चं ग्लोबल लाँचिंग करण्यासाठी प्राजक्ता माळी तिथे अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिली आहे. प्राजक्ता माळीसोबतच कान्समध्ये मराठीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरसुद्धा रेड कार्पेटवर उतरले होते.