"मी स्टुडिओत गेलो तेव्हा तिथे..."; रोहित आर्याला भेटल्यावर काय घडलं? गिरीश ओक यांनी सगळं सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 11:41 IST2025-11-02T11:40:45+5:302025-11-02T11:41:01+5:30
रोहित आर्या प्रकरण घडण्याच्या आदल्या दिवशी डॉ. गिरीश ओक यांची स्टुडिओत रोहितसोबत भेट झाली होती. तेव्हा काय घडलं?

"मी स्टुडिओत गेलो तेव्हा तिथे..."; रोहित आर्याला भेटल्यावर काय घडलं? गिरीश ओक यांनी सगळं सांगितलं
पवईतील आर ए स्टुडिओमध्ये मुलांना डांबून स्वतःच्या मागण्या पूर्ण करणारा निर्माता रोहित आर्याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. या घटनेआधी रोहित आर्याचा अनेक मराठी कलाकारांशी संपर्क झाला होता. त्यापैकी एक कलाकार म्हणजे डॉ. गिरीश ओक. ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांनी या घटनेच्या आदल्याच दिवशी (२९ ऑक्टोबर) रोहित आर्याच्या स्टुडिओला भेट दिली होती. त्यावेळी काय घडलं? याचा खुलासा त्यांनी केला आहे.
रोहित आर्याच्या स्टुडिओत गेल्यावर काय घडलं?
गिरीश ओक यांनी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ''माझ्यासोबत पूर्वी काम केलेल्या एका व्यक्तीने रोहित आर्याच्या चित्रपटातील भूमिकेसाठी माझ्याशी संपर्क साधला होता. रोहितने स्वतःची ओळख चित्रपट निर्माता म्हणून केली होती, म्हणून मी भेटायला तयार झालो. आम्ही एका सामाजिक विषयावर आधारित सिनेमावर चर्चा केली. स्टुडिओमध्ये मला अनेक मुलं दिसली, म्हणून मी त्यांच्याबद्दल चौकशी केली. तेव्हा रोहितने सांगितले की ती मुलं एका वर्कशॉपसाठी आले आहेत. या मुलांनी माझ्यासोबत ग्रुप फोटो देखील काढला, आणि काही पालकांनी माझ्यासोबत सेल्फीही काढले. मी दुपारी साधारण बाराच्या सुमारास तेथून निघालो."
गिरीश ओक यांना जेव्हा या घटनेविषयी कळालं तेव्हा त्यांना चांगलाच धक्का बसला. रोहित असं काही करेल, याची त्यांना कल्पना नव्हती. दरम्यान मुंबईतील पवई भागातील एका स्टुडिओमध्ये १७ मुलांना ओलिस ठेववण्याचा प्रकार करणाऱ्या रोहित आर्याबद्दल आता अनेक खुलासे होत आहेत. ओलीस ठेवलेल्या मुलांचा जीव वाचवताना झालेल्या गोळीबारात रोहित आर्या याचा मृत्यू झाला. या दरम्यान रोहित या प्रकरणाची योजना गेल्या अनेक दिवसांपासून करत असल्याचे समोर आले आहे.