"लक्ष्या गेला, सुधीर गेला आणि सचिनने.."; इंडस्ट्रीतील मैत्रीबद्दल अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना, काय म्हणाले?
By देवेंद्र जाधव | Updated: July 19, 2025 12:17 IST2025-07-19T12:16:34+5:302025-07-19T12:17:09+5:30
अशोक सराफ गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. अशोक यांनी सिनेसृष्टीतील त्यांच्या मित्रांबद्दल आणि मैत्रीबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलंय

"लक्ष्या गेला, सुधीर गेला आणि सचिनने.."; इंडस्ट्रीतील मैत्रीबद्दल अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना, काय म्हणाले?
अशोक सराफ हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. अशोक यांना आपण विविध सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. काहीच दिवसांपूर्वी अशोक यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. नुकत्याच अमुक तमुक चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ यांनी इंडस्ट्रीतील मित्र आणि मैत्रीबद्दल मनातील भावना व्यक्त करत आहेत. काय म्हणाले अशोक सराफ? जाणून घ्या
अशोक सराफ म्हणाले, "मित्र हे महत्वाचे असतातच. अर्थात ते कोणासाठीही असतात. तो तुम्हाला एक आधार असतो. समविचाराचे असतात तेच मित्र बनू शकतात. समव्यावसायिक असतात तेच मित्र बनू शकतात. पण काय असतं? तुम्ही मित्र काय जमा करता हेही महत्वाचं ठरतं ना. आमच्या धंद्यात असंय की, जर समजा आम्ही टॉपला गेलो तर मित्र कुठल्या उद्देशाने जमा झालेत याचा विचार करावा लागेल ना?"
"मित्र आपण म्हणतो तेव्हा कधीतरी काहीतरी साक्ष असते नाहीतर तुम्ही कधीही म्हणू शकत नाही हा माझा सच्चा मित्र आहे. काहीतरी त्याच्याकडून तुमच्यासाठी घडलं असेल ना, तेव्हा तुम्ही म्हणता हा माझ्यासोबत एकदम संकटात सुद्धा उभा राहील. मित्र असणं आणि गोतावळा असणं बरंच आहे ना, तेवढाच तुम्हाला तो रिलिफ असतो."
"माझे तर असंख्य मित्र होते केव्हापासून. कारण माझा स्वभावच तसा आहे. पण मी सगळे मित्र नाही करु शकत. माझं हे बदलत गेले, तसे सगळे मित्र गेले. काही इकडे तिकडे गेले तसे सगळे मित्र सोडून गेले. आम्ही आधी एक पिक्चर करायचो तेव्हा एक दिवस असा नाही जायचा की आम्ही रात्री त्याच्या घरी जाऊन बसलोय. मी, लक्ष्या, सचिन, सुधीर जोशी, विजय पाटकर.. आज ह्याच्या घरी आज त्याच्या घरी. पण लक्ष्या गेला, सुधीर गेला. सचिनची लाईन बदलली, माझी लाईन बदलली. मग आता काय, भेटेनासे झाले मग आम्ही. भेटेनासे झाले त्यामुळे अजूनही आहे मैत्री पण ती तशी नाही राहिली ना."