अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळलेला चाहता, हास्यजत्रा पाहून बरा झाला; ओंकार राऊतने सांगितला 'तो' भावुक प्रसंग, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2026 17:35 IST2026-05-12T17:33:36+5:302026-05-12T17:35:34+5:30
ओंकार राऊतने सांगितला चाहत्याचा भावुक किस्सा, काय घडलेलं?

अर्धांगवायूमुळे अंथरुणाला खिळलेला चाहता, हास्यजत्रा पाहून बरा झाला; ओंकार राऊतने सांगितला 'तो' भावुक प्रसंग, म्हणाला...
Onkar Raut : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता ओंकार राऊत (Onkar Raut). अभिनयाबरोबरच विनोदाच्या अचूक टायमिंगमुळे ओंकारने प्रेक्षकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.ओंकार राऊत याने याआधी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं. त्याचा फॅन फॉलोइंग खूप मोठा आहे. ओंकार राऊत फक्त कामासाठी नाही तर, त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अभिनेता सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने एका चाहत्याचा हृदयस्पर्शी किस्सा सांगितला आहे.
अलिकडेच ओंकार राऊतने 'मटा ऑनलाईन'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याचा अभिनय प्रवास तसेच इतर गोष्टींविषयी देखील सांगितलं. याचदरम्यान, त्याने एका वयोवृद्ध चाहत्याच्या भेटीचा भावुक प्रसंग शेअर केला. यावेळी तो म्हणाला,
'एकदा मी आमच्या घराच्या येथे खाली दुकानात वाण्याकडे सामान आणायला गेलेलो.
तिथे एक माणूस आला, त्यांचं वय साधारण ५५ वर्ष इतकं असेल. त्या माणसाने डायरेक्ट येऊन माझे पायच धरले. मी थोडा घाबरलो आणि त्यांनी विचारलं अहो, काका असं का करताय? त्यांनी मला परत मिठी मारली आणि खुर्चीवर जाऊन बसले.
या मुलाखतीत पुढे ओंकारने सांगितलं,"तेव्हा ते काका मला म्हणाले, 'तुम्हाला माहित नाहीये, तुम्ही काय केलंय.'त्या माणसाने मला सांगितलं, आता मी हास्यजत्रेमुळेच जिवंत आहे. बाकी कोणामुळेच नाही. माझी उजवी बाजू पूर्ण पॅरलाईज्ड होती. मी एका जागेवर झोपलेलो असायचो. मी फक्त हास्यजत्रा बघायचो आणि हसायचो. डॉक्टरांनी कधी बरा होईन हे सांगितलं नव्हतं. फक्त गोळ्या, औषधं चालू होती. मी समीर दादा आणि विशाखा ताईचं स्किट बघत होतो आणि मला एवढं हसू आलं की, माझ्या आत काय झालं माहित नाही. आणि त्यावेळी मी हसता हसता उठून बसलो आणि त्या आजारातून मी बरा झालो.'लाफ्टर इज मेडिसिन' आपण ऐकतो फक्त. पण, हे त्याच्यासाठी खरं ठरलं. तेव्हा मला काहीच सुचलं नाही. त्यावेळी आपल्यावर आणखी जबाबदारी येते."
चाहत्याचा तो विचार नाहीसा झाला...
या मुलाखतीत आणखी एक चाहत्याच्या भेटीचा किस्सा सांगताना ओंकार म्हणाला,
"त्यावेळी आणखी एक चाहता आलेला. त्याचा घटस्फोट होऊन सहा महिने झालेले. तो जीव देणार होता. पण त्याने हास्यजत्रा पाहिली आणि त्याच्या डोक्यातून आयुष्य संपवण्याचा विचार पूर्णपणे गेला. तो हे सगळं रडत रडत सांगत होतं. या सगळ्यामुळे कधीकधी खूप भावुक व्हायला होतं."