'धुरंधर'चे ओटीटीवर काऊंटडाऊन सुरू! सनी देओलच्या बॉर्डर २ वर होणार परिणाम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 16:43 IST2026-01-27T16:42:21+5:302026-01-27T16:43:05+5:30
मुंबई: बॉक्स ऑफिसवर सध्या सनी देओलच्या 'बॉर्डर २'ची त्सुनामी पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर या चित्रपटाने विक्रमी कमाई ...

'धुरंधर'चे ओटीटीवर काऊंटडाऊन सुरू! सनी देओलच्या बॉर्डर २ वर होणार परिणाम?
मुंबई: बॉक्स ऑफिसवर सध्या सनी देओलच्या 'बॉर्डर २'ची त्सुनामी पाहायला मिळत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर या चित्रपटाने विक्रमी कमाई केली असली, तरी आता या प्रवासात एक मोठा अडथळा येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट 'धुरंधर' आता ओटीटीवर धडकण्यासाठी सज्ज झाला आहे, ज्याचा थेट परिणाम 'बॉर्डर २' च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर होऊ शकतो.
रणवीर सिंह स्टारर आणि आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' हा चित्रपट ३० जानेवारी २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. तब्बल १२०० कोटींहून अधिक जागतिक कमाई करणाऱ्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे, 'धुरंधर २' चा टीझर देखील लवकरच येणार असल्याने या चित्रपटाची चर्चा पुन्हा एकदा शिगेला पोहोचली आहे.
काय आहे नियम...
थिएटरमध्ये आणि ओटीटीवर फिल्म रिलीज करण्यासाठी एक महत्वाचा नियम आहे. तो असा की ओटीटीवर फिल्म रिलीज करायची असेल तर आठ आठवड्यांनीच करावी, तरच थिएटर दिले जातील असा हा नियम आहे. धुरंधरचा लॉकइन पिरिएड हा ३० जानेवारीला संपत आहे. म्हणजेच तेव्हापासून नेटफ्लिक्स या ओटीटीवर धुरंधर रिलिज होण्याचे मार्ग मोकळे झाले आहेत.
'बॉर्डर २' वर काय होणार परिणाम?
'बॉर्डर २' आणि 'धुरंधर' हे दोन्ही चित्रपट देशभक्ती आणि ॲक्शन या एकाच धाटणीचे आहेत. 'धुरंधर' घरबसल्या उपलब्ध झाल्यामुळे, जो प्रेक्षक दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा 'बॉर्डर २' पाहण्याचा विचार करत होता, तो आता 'धुरंधर' पाहण्याला पसंती देऊ शकतो. ओटीटीवर रिलीज होताच सोशल मीडियावर 'धुरंधर'ची चर्चा वाढेल, ज्यामुळे थिएटरमध्ये सुरू असलेल्या 'बॉर्डर २' च्या हायपला थोडा लगाम बसू शकतो. 'बॉर्डर २' ने पहिल्या तीन दिवसांत १२८ कोटींहून अधिक कमाई करून 'धुरंधर'चा सुरुवातीचा रेकॉर्ड मोडला आहे. मात्र, 'धुरंधर'ची 'लाँग रन' (दीर्घकाळ टिकण्याची क्षमता) खूप मोठी होती. आता ओटीटीवर आल्यानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये येईल.
बॉक्स ऑफिसची सद्यस्थिती
'बॉर्डर २' ने अवघ्या ४ दिवसांत भारतात १८० कोटींचा टप्पा पार केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा या चित्रपटाला मोठा फायदा झाला. मात्र, ३० जानेवारीपासून 'धुरंधर' डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार असल्याने, सनी देओलच्या या वॉर ड्रामाला दुसऱ्या आठवड्यात तगडी स्पर्धा मिळणार आहे.