‘द काश्मीर फाइल्स’ केवळ चित्रपट नव्हता, एक इशारा होता! पहलगाम हल्ल्यानंतर काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 17:42 IST2025-04-23T17:41:07+5:302025-04-23T17:42:57+5:30
पहलगाम हल्ल्यानंतर विवेक अग्निहोत्रींनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या द काश्मिर फाइल्स सिनेमाचा दाखला दिलाय

‘द काश्मीर फाइल्स’ केवळ चित्रपट नव्हता, एक इशारा होता! पहलगाम हल्ल्यानंतर काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या भ्याड हल्ल्यात अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. या घटनेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील या घटनेवर प्रतिक्रिया देताना काश्मीरमधील परिस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आणि या दहशतवादी हल्ल्याची शक्यता आपल्याला पूर्वीपासूनच वाटत असल्याचे म्हटले आहे.
पहलगाममध्ये झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, त्यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा केवळ चित्रपट नव्हता, तर तो एक इशारा होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर करताना विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, ’२२ वर्षांपूर्वी नदीमार्गमध्ये हिंदूंना एका रांगेत उभे करून गोळ्या घातल्या गेल्या होत्या. आज पहलगाममध्ये पर्यटकांची कत्तल झाली आहे. तोच रक्तपात, तीच दरी आणि तीच शांतता. ‘द काश्मीर फाइल्स’ हा केवळ चित्रपट नव्हता, तो एक इशारा होता. अशा नरसंहाराकडे आणखी कितीकाळ दुर्लक्ष करणार?’
22 years ago in Nadimarg, Hindus were lined up and shot. Today in Pahalgam, tourists are massacred. Same bloodshed. Same valley. Same silence.#TheKashmirFiles wasn’t just cinema, it was a warning. How long will this genocide be ignored? #RightToJustice#NeverForgetpic.twitter.com/PR06eSIYh4
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 23, 2025
काश्मीरमधील परिस्थितीविषयी बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, तिथे केवळ रणनीती आखून निर्माण केलेली भ्रामक शांतता होती. कामानिमित्ताने शिकागोमध्ये गेल्यानंतर फोन सुरू करताच ही वाईट बातमी आपल्याला कळल्याचं त्यांनी म्हटलं. पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पतीच्या देहाशेजारी विलाप करणाऱ्या नववधूचा हृदयद्रावक फोटो शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘अरे देवा! मी नुकताच शिकागोमध्ये उतरलो आणि या अमानवीय दुर्घटनेबद्दल कळलं. मला खूप दिवसांपासून हीच भीती वाटत होती. काश्मीर कधीच शांत नव्हतं, तिथे केवळ धोरणात्मक शांतता लागू होती.’ यावेळी त्यांनी काश्मीर आणि बंगाल दोन्ही ठिकाणी तातडीने लक्ष घालून योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केली.
‘द काश्मीर फाइल्स’ने दाखवलं दाहक सत्य!
विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाची कथा स्वतः विवेक अग्निहोत्री यांनीच लिहिली होती. तर, या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. या चित्रपटात १९९०मध्ये काश्मीरी पंडितांवर झालेला अन्याय आणि नरसंहार दाखवण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेते मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, दर्शन कुमार आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
पहलगामच्या घटनेमुळे देश हादरला!
काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यात तब्बल २८हून अधिक पर्यटकांचा बळी गेला आहे. देशाच्या विविध भागातून आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी निघालेल्या लोकांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या तीन जणांचे रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. या हल्ल्यात सामील असणारे तीन आतंकवादी पाकिस्तानचे असल्याचे यंत्रणांनी म्हटले आहे. लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी गटाची संघटना असलेल्या रेझिस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.