शाहरुख खानच्या ताफ्यात 'चालतं-फिरतं प्रायव्हेट जेट' समजली जाणारी SUV, गाडीची किंमत किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:36 IST2026-05-15T14:35:50+5:302026-05-15T14:36:11+5:30
ही केवळ एक कार नसून तिला 'चालतं-फिरतं प्रायव्हेट जेट' म्हटले जाते.

शाहरुख खानच्या ताफ्यात 'चालतं-फिरतं प्रायव्हेट जेट' समजली जाणारी SUV, गाडीची किंमत किती?
बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खान आपल्या अभिनयासोबतच त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठी नेहमीच चर्चेत असतो. आता शाहरुख पुन्हा एकदा सर्वांचं लक्ष वेधलं आहे. शाहरुखने आपल्या कार कलेक्शनमध्ये जगातील सर्वात प्रीमियम मानल्या जाणाऱ्या कॅडिलॅक एस्केलेड (Cadillac Escalade) या एसयूव्हीची भर घातली आहे. मुंबईच्या रस्त्यांवर ही आलिशान कार धावतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
विशेष म्हणजे, अमेरिकन कंपनी 'कॅडिलॅक' भारतात अधिकृतपणे आपल्या गाड्या विकत नाही. त्यामुळे शाहरुखने ही कार खास परदेशातून आयात (Import) केली असल्याचे समजते. भरमसाठ आयात शुल्क आणि कर धरून या कारची भारतातील किंमत सुमारे ५ कोटी रुपयांच्या घरात जाते. कॅडिलॅक एस्केलेड ही केवळ एक कार नसून तिला 'चालतं-फिरतं प्रायव्हेट जेट' म्हटले जाते.
कॅडिलॅक एस्केलेडमध्ये ६.२-लिटर शक्तिशाली V८ इंजिन आहे. गाडीत ३८-इंचाचा वक्र (Curved) OLED डॅशबोर्ड देण्यात आला आहे. अत्यंत आरामदायक इंटीरियर आणि हाय-टेक सुरक्षेची वैशिष्ट्ये यात आहेत. हॉलिवूडमधीलही अनेक सुपरस्टार ही एसयूव्ही वापरतात. एवढेच नाही, तर अमेरिकेचे राष्ट्रपती देखील कॅडिलॅक एस्केलेडचा वापर करतात. तसेच भारतात ही SUV उद्योगपती मुकेश अंबानी यांच्याकडेही आहे.
शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो आगामी 'किंग' या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटामुळेही चर्चेत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान, दीपिका पादुकोण आणि अभिषेक बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा बहुप्रतिक्षित चित्रपट २४ डिसेंबर २०२६ रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.