संजय दत्तच्या 'आखिरी सवाल'ची रिलीज डेट शेवटच्या क्षणी बदलली; आता 'या' तारखेला प्रदर्शित होणार सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 11:21 IST2026-05-08T11:11:04+5:302026-05-08T11:21:43+5:30
संजय दत्तचा 'आखिरी सवाल' हा चित्रपट आता ८ मे ऐवजी १५ मे २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. मिळालेल्या माहितीनुसार, सेन्सॉर सर्टिफिकेट मिळण्यास उशीर झाल्यामुळे चित्रपट ठरलेल्या वेळेत प्रदर्शित होऊ शकला नाही.

संजय दत्तच्या 'आखिरी सवाल'ची रिलीज डेट शेवटच्या क्षणी बदलली; आता 'या' तारखेला प्रदर्शित होणार सिनेमा
संजय दत्त सध्या त्याच्या आगामी 'आखिरी सवाल' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट उद्या, शुक्रवार ८ मे रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे. चित्रपटाची नवीन रिलीज डेट आणि ट्रेलरबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
संजय दत्तचा 'आखिरी सवाल' हा चित्रपट आता ८ मे ऐवजी १५ मे २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल. मिळालेल्या माहितीनुसार, सेन्सॉर सर्टिफिकेट मिळण्यास उशीर झाल्यामुळे चित्रपट ठरलेल्या वेळेत प्रदर्शित होऊ शकला नाही. आता सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला असून निर्मात्यांनी नवीन तारखेची घोषणा केली आहे. चित्रपट पुढे ढकलला गेला असला, तरी उद्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी सांभाळली आहे, तर पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद हे सह-निर्माते आहेत. नॅशनल अवॉर्ड विजेते चित्रपट निर्माते अभिजित मोहन वारंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, "उद्या देश खरं काय ते बघेल. बहुप्रतिक्षित ट्रेलर उद्या येत आहे."
काय आहे चित्रपटाची कथा?
'आखिरी सवाल'मध्ये संजय दत्तसोबत नमाशी चक्रवर्ती, समीरा रेड्डी, अमित साध, नीतू चंद्रा आणि त्रिधा चौधरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. संजय दत्त चित्रपटात 'प्रोफेसर गोपाळ नाडकर्णी' यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात ऐतिहासिक संदर्भ असून यामध्ये आरएसएसचा (RSS) इतिहास पाहायला मिळणार आहे. तसेच आरएसएसवरील बंदी, बाबरी मशीदीचा वाद यांसारख्या अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा उल्लेख या चित्रपटात करण्यात आला आहे. आता १५ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.