Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 21:36 IST2025-10-29T21:36:12+5:302025-10-29T21:36:35+5:30
Sudhir Dalvi Hospitalised: साई बाबांच्या भूमिकेमुळे ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेते सुधीर दळवींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ते सध्या गंभीर आजाराशी झुंज देत असून कुटुंबीयांनी त्यांच्या चाहत्यांना मदतीचं आवाहन केलं आहे

Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
Sudhir Dalvi Hospitalised: 'शिर्डी के साई बाबा' या चित्रपटातून देशभरात ओळख मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी (Sudhir Dalvi) यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांच्यावर सध्या मुंंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वैद्यकीय उपचारांचा खर्च खूप मोठा असल्याने, त्यांच्या कुटुंबीयांनी आता लोकांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केलं आहे. मागील काही काळापासून सुधीर दळवी हे सेप्टिक इन्फेक्शन झाल्याने गंभीर आजारपणाशी झुंज देत आहेत.
कुटुंबाने केलं मदतीचं आवाहन
मीडिया रिपोर्टनुसार, सुधीर दळवी यांच्या उपचारासाठी मोठा वैद्यकीय खर्च येत आहे. त्यांच्या उपचारांसाठी १५ लाख रुपये इतक्या मोठ्या रकमेची आवश्यकता आहे. त्यांच्या कुटुंबाला एवढी मोठी रक्कम एकाच वेळी जमा करणे शक्य नसल्याने त्यांनी आता चित्रपटसृष्टीतील लोकांना आणि सुधीर यांच्या चाहत्यांना मदतीचा हात पुढे करण्याचं आवाहन केलं आहे. यासाठी रणबीर कपूरची बहीण रिद्धीमाने आर्थिक मदत केली असून अभिनेते यातून बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली आहे. सुधीर दळवी हे सध्या ८६ वर्षांचे आहेत. त्यांचे चाहते आणि फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार यासाठी मदत करतील, अशी कुटुंबाला आशा आहे.
सुधीर दळवी यांचा कलाप्रवास
सुधीर दळवी यांना 'शिर्डी के साई बाबा' (१९७७) या चित्रपटामुळे भरपूर प्रसिद्धी मिळाली. याशिवाय 'जय संतोषी माँ' आणि 'रामायण'सारख्या टीव्ही मालिकांमधूनही त्यांची लोकप्रियता वाढली. सुधीर यांनी 'विधिलिखित', 'ऐकावं ते नवल', 'देवता', 'घर संसार' या मराठी सिनेमांमध्येही काम केलंय. आजही शिर्डीवाल्या साई बाबांचं रुप आठवलं की अनेकांना सुधीर दळवी यांनी साकारलेली भूमिका आठवते. या गंभीर आजारातून सुधीर दळवी लवकर बरे होतील, अशी चाहते प्रार्थना करत आहेत.